गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने याच्यासह नऊ साथीदारांना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले.
पुणे - गुलटेकडी येथील मीनाताई ठाकरे वसाहतीमध्ये दहशत माजविणाऱ्या कोयता गँगचा म्होरक्या सचिन माने याच्यासह नऊ साथीदारांना स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले. आरोपींकडून कोयते, तलवार अशी घातक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. या सर्व आरोपींविरुद्ध संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
सचिन परशुराम माने (वय २४) हा कोयता गॅंगचा म्होरक्या असून, त्याचे साथीदार विजय प्रमोद डिखळे (वय २२), अमर तानाजी जाधव (वय ३२), रमेश दशरथ मॅडम (वय २०), अजय प्रमोद डिखळे (वय २४), रोहित मधुकर जाधव (वय २७), यश किसन माने (वय २१), मोन्या ऊर्फ सूरज सतीश काकडे (वय २६, सर्व रा. औद्योगिक वसाहत, गुलटेकडी), निखिल राकेश पेटकर (वय २२, रा. आईमाता मंदिराजवळ, बिबवेवाडी) या आरोपींना अटक केली आहे. तर, एका अल्पवयीन मुलासह पल्या पासंगे (वय २१), आयुष किसन माने (वय २१ दोघे रा. गुलटेकडी), माया ऊर्फ अभिषेक पाटोळे (वय २२), प्रमोद ऊर्फ पम्या (दोघे रा. जनता वसाहत) यांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या सूचनेनुसार या सर्व आरोपींविरुद्ध मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती स्वारगेटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
सराईत गुन्हेगार सचिन माने आणि त्याच्या साथीदारांनी प्रतिस्पर्धी टोळीतील प्रकाश पवार आणि त्याच्या तीन साथीदारांवर कोयत्याने वार केले. त्यात पवार आणि अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले होते. कसबा विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी पोलिस बंदोबस्तात असताना हा प्रकार घडला होता. स्वारगेट पोलिसांनी त्याचदिवशी चार आरोपींना अटक केली होती. परंतु या टोळीचा म्होरक्या सचिन माने आणि त्याचे इतर साथीदार पसार झाले होते. माने याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील आणि सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेटचे वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ गायकवाड, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, मुकुंद तारु, शिवा गायकवाड, अनिस शेख, दीपक खेंदाड, सुजय पवार, सोमनाथ कांबळे, फिरोज शेख, रमेश चव्हाण यांनी ही कारवाई केली.
मैत्रिणीला भेटण्यास येताच पोलिसांच्या जाळ्यात-
सराईत गुन्हेगार सचिन माने हा घोरपडे पेठेतील त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. पोलिसांनी सापळा रचून पहाटे दोनच्या सुमारास त्याला ताब्यात घेतले. परंतु त्यावेळी झटापटीत माने याने कोयत्याने केलेल्या हल्ल्यात पोलिस कर्मचारी शिवा गायकवाड हे जखमी झाले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.