कोयता गँगमधील तिघांच्या आवळल्या मुसक्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Pune Crime : कोयता गँगमधील तिघांच्या आवळल्या मुसक्या

पुणे - हडपसर आणि इतर भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी उसाच्या फडातून पसार झालेल्या दोघांना पाठलाग करुन ताब्यात घेतले. तसेच, कोयता गँगमधील आणखी एकाला नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातून अटक केली.

कोयता गँगचा म्होरक्या स्वप्नील उर्फ बिट्ट्या संजय कुचेकर (वय-२२, रा. मांजरी, हडपसर), पंकज गोरख वाघमारे (वय-२८, रा. बंटर स्कुलजवळ, हडपसर), सत्यम विष्णू भोसले (रा. हडपसर)अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मांजरी परिसरात तीन जानेवारी रोजी दरोडा आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बिट्ट्या कुचेकर आणि पंकज वाघमारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून ते पसार झाले होते. दोघेजण शिरुर तालुक्यातील पाबळ गावात येणार असल्याची माहिती हडपसर पोलिसांना मिळाली.

त्यानंतर पोलिसांचे एक पथक पाबळला गेले. पोलिसांना पाहताच कुचेकर आणि वाघमारे उसाच्या फडातून पसार झाले.परंतु पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना पकडले. तसेच, कोयता गँगमधील सत्यम भोसले याला पोलिसांच्या पथकाने नगर जिल्ह्यातील पाथर्डी गावातून अटक केली.