चापेकरांनी चेतविले स्फुल्लिंग - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

पिंपरी - ‘‘क्रांतिवीर चापेकर बंधूंनी तरुणांच्या मनामध्ये देशभक्ती व क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविले. त्यातून अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे स्वातंत्र्याची बिजे रोवली गेली. त्यांच्या नावाने संग्रहालय होत आहे. त्यात देशातील क्रांतिकारक व महापुरुषांचा इतिहास असेल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. २३) केले.

पिंपरी - ‘‘क्रांतिवीर चापेकर बंधूंनी तरुणांच्या मनामध्ये देशभक्ती व क्रांतीची ज्योत प्रज्वलित केली. क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविले. त्यातून अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे स्वातंत्र्याची बिजे रोवली गेली. त्यांच्या नावाने संग्रहालय होत आहे. त्यात देशातील क्रांतिकारक व महापुरुषांचा इतिहास असेल,’’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. २३) केले.

पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती यांच्यातर्फे चिंचवडगावात क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर महासाधू मोरया गोसावी क्रीडांगणावर आयोजित सभेत ते बोलत होते. महापौर नितीन काळजे अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, उपमहापौर शैलजा मोरे, स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, भाजपचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे, महापालिका सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.  

फडणवीस म्हणाले, ‘‘पुण्यात १९ व्या शतकाच्या शेवटी प्लेगची साथ आली. त्या वेळी इंग्रज अधिकारी रॅंडची नियुक्ती करण्यात आली. मात्र, तो महिला व सर्वसामान्य नागरिकांवर अत्याचार करू लागला. प्लेगपेक्षा रॅंडची जास्त भीती नागरिकांना वाटू लागली. त्या वेळी छत्रपती शिवरायांपासून प्रेरणा घेऊन १८, २२ आणि २७ वर्षांच्या चापेकर बंधूंनी निर्णय घेतला की, अन्याय करणाऱ्या रॅंडला जगू देणार नाही आणि पुण्यनगरीवर अत्याचार करणाऱ्यांना संपविण्याचे काम 

चापेकर बंधूंनी केले. अशा क्रांतिकारकांच्या संग्रहालयाच्या भूमिपूजनाची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे. माझ्यापेक्षा भारतमाता मोठी आहे, या भावनेने लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या बलिदानाचे मोल तरुणांना कळले पाहिजे. इतिहास विसरणाऱ्या समाजाला तेच द्यायचे आहे. वर्तमान घडवायचा असतो. आता स्वराज्य मिळाले आहे, सुराज्यासाठी लढायची संधी आहे. त्यासाठी संकुचित विचारांपेक्षा देशाचा विचार केला पाहिजे.’’

घोषणा देणारी महिला ताब्यात
पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रखुमाई मंदिरात मुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर दौरा रद्द केला. मात्र, पूजेच्या नियोजित वेळेनंतर अवघ्या काही तासांनीच त्यांनी चिंचवड येथे क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे भूमिपूजन केले. त्यामुळे चिंचवड परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. जाहीर सभेच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त होता. एकाच प्रवेशद्वारातून नागरिक व पदाधिकाऱ्यांना सभास्थानी सोडण्यात आले. नागरिकांमध्येही पोलिस तैनात होते. फडणवीस यांचे भाषण सुरू असतानाच, एका महिलेने घोषणा द्यायला सुरवात केली, तिची घोषणा पूर्ण होण्यापूर्वीच महिला पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. सभा संपल्यानंतर तिला सोडून दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Krantiveer Chaphekar National Museum Bhumi Pujan