कुकडी डावा कालव्यात सोडले पाणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 मे 2018

नारायणगाव - उन्हाळी हंगामासाठी येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. या आवर्तनात सुमारे चाळीस दिवसांत ३.२ टीएमसी पाणी कालव्याद्वारे सोडण्यात येणार आहे. कालव्यात सोडलेल्या पाण्याचा लाभ जुन्नर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना शेती सिंचन व पिण्यासाठी टेल टू हेड या पद्धतीने होणार आहे, अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१चे शाखा अभियंता प्रकाश मांडे यांनी दिली.

कुकडी प्रकल्पातील धरणाअंतर्गत जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्‍यांना जोडणाऱ्या कालव्यांची एकूण लांबी सुमारे सहाशे किलोमीटर आहे. यापैकी जुन्नर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या पाच तालुक्‍यांना जोडणारा कुकडी डावा कालवा २४९ किलोमीटर लांबीचा आहे. कुकडी प्रकल्पाअंतर्गत सुमारे सत्तर टक्के सिंचन या कालव्याद्वारे केले जाते. १ मे २०१८ ते १० मे २०१८ दरम्यान डिंभा,  माणिकडोह, चिल्हेवाडी या धरणांतील पाणी येडगाव धरणात सोडून दहा मेपासून कुकडी डावा कालव्यात उन्हाळी आवर्तन सोडण्यास सुरवात केली आहे. सध्या कालव्यात चौदाशे क्‍युसेक या दराने पाणी सोडण्यात आले आहे. पुढील चाळीस दिवसांत येडगाव धरणातून ३.२ टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन कुकडी पाटबंधारे विभागाने केले आहे. ‘टेल टू हेड’ या पद्धतीने पाच तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना कालव्यातील पाण्याचा वापर करता येणार आहे. पाण्याचे समान वाटप करण्यासाठी कालवा परिसरात संचार बंदी लागू करण्यात आली असून, गस्त पथकाची नेमणूक केली आहे. पाण्याची चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती मांडे यांनी दिली.

‘कुकडी’त 5.30 टीएमसी उपयुक्त साठा
कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर ५.३० टीएमसी (१७.३७ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पूर्ण होण्यासाठी गरजेनुसार पिंपळगाव जोगा धरणातील सुमारे 
२ टीएमसी मृत पाणीसाठ्याचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे उन्हाळी आवर्तन पूर्ण झाल्यानंतर कुकडी प्रकल्पात किमान तीन टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहणार आहे.

Web Title: kukadi left canal water