कुकडी प्रकल्पात 63 टक्के पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

नारायणगाव - कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणात आजअखेर 63.26 टक्के (19.31 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी आजअखेर प्रकल्पात 79.11 टक्के (22.02 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत प्रकल्पात 15.26 टक्के (2 टीएमसी) कमी पाणीसाठा झाला आहे. दीड महिन्यापासून तालुक्‍याच्या मध्य व पूर्व भागात ढगाळ वातावरण असून पाऊस पडत नसल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. ढगाळ वातावरणामुळे फळ भाजीपाला पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे (ता. जुन्नर) व डिंभे (ता. आंबेगाव) या धरणांचा समावेश होतो. प्रकल्पाची उपयुक्त पाणीसाठवण क्षमता 30.54 टीएमसी आहे. प्रकल्पात मेअखेर 6.86 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. जून महिन्यात धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली. डिंभा धरणाच्या पाणलोट क्षेत्राचा अपवाद वगळता जुलै महिन्यात इतर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नाही. तालुक्‍यात मागील दीड महिन्यापासून ढगाळ वातावरण आहे. मध्य व पूर्व भागात पावसाने दडी मारली आहे. ढगाळ वातावरणामुळे फळ भाजीपाला पिकांवर कीड व रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने पिके धोक्‍यात आली आहेत.

ढगाळ वातावरणामुळे टोमॅटोवर मोठ्या प्रमाणात लालकोळीचा प्रादुर्भाव झाला असून काढणीच्या अवस्थेत असलेल्या सीताफळावर मिलीबगचा प्रादुर्भाव झाला आहे. भीमाशंकर परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने डिंभा धरणात मंगळवारी सकाळी आठपर्यंत 92.74 टक्के (11.58 टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. डिंभा धरणातून डाव्या कालव्याद्वारे येडगाव धरणात पाणी सोडल्याने येडगाव धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तालुक्‍याच्या मध्य व पूर्व भागात समाधानकारक पाऊस न झाल्याने या भागातील विहिरी व विंधन विहिरीच्या पाणीपातळीत अद्याप वाढ झाली नाही. शेतकरी मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणनिहाय उपयुक्त पाणीसाठा (कंसात टीएमसी) - येडगाव - 66.15 टक्के (1.85), माणिकडोह - 48 टक्के (4.89), वडज - 63.8 टक्के (0.74), पिंपळगाव जोगे - 8 टक्के (0.3), डिंभा - 92.74 टक्के (11.58).

Web Title: Kukadi Project 63 Percentage Water Storage