द्वेषभावना असेल, तर तुम्ही राष्ट्रभक्त : कुमार केतकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 सप्टेंबर 2019

"सध्याच्या वातावरणात द्वेषभावना असेल, तरच तुम्ही राष्ट्रभक्त आहात,'' अशा शब्दांत खासदार कुमार केतकर यांनी रविवारी सत्ताधारी भाजपच्या धोरणांवर टीका केली. धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या "कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता' पुरस्कार वितरण कार्यक्रमात केतकर बोलत होते.

पुणे : "सध्याच्या वातावरणात द्वेषभावना असेल, तरच तुम्ही राष्ट्रभक्त आहात,'' अशा शब्दांत खासदार कुमार केतकर यांनी रविवारी सत्ताधारी भाजपच्या धोरणांवर टीका केली. 
धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या "कै. धनंजय थोरात आदर्श कार्यकर्ता' पुरस्कार वितरण कार्यक्रमात केतकर बोलत होते. या वेळी केतकर यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते उमरअली सय्यद, हार्मोनिअम वादक डॉ. अरविंद थत्ते आणि साईनाथ मंडळाचे पीयूष शहा यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी तालयोगी पं. सुरेश तळवलकर, खासदार गिरीश बापट, उल्हास पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन जोशी, शुभांगी थोरात, रामदास फुटाणे आदी उपस्थित होते. 

केतकर म्हणाले," सध्याच्या वातावरणात हिंदू गणेशोत्सव कार्यकर्ता आणि मुस्लिम शिक्षकाला पुरस्कार दिला जातो आहे. सध्याच्या वातावरणाविरोधात तुम्ही वागले आहात, असे पुरस्कार देऊन तुम्ही राष्ट्रदोहाचे काम केले आहे; पण या राष्ट्रदोहाचे आपण स्वागत करावयाला हवे. असे पुरस्कार देण्याचे काम जर राष्ट्रदोहाचे असेल, तर त्या राष्ट्रद्रोहाने राष्ट्र एकत्र येईल. मात्र खोट्या राष्ट्रप्रेमाने राष्ट्र दुभंगेल.'' 

सय्यद म्हणाले, ""शिक्षक हा समाजाचा कार्यकर्ता असेल, तर समाजाची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने घडवायचे असेल, तर शिक्षकालाही चाकोरीबाहेर जाऊन काम करावे लागेल.'' या वेळी अरविंद थत्ते, पीयूष शहा आदींची भाषणे झाली. सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. विकास अबनावे यांनी आभार मानले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kumar Ketkar said you are a patriot