‘कुंडलिका’तून पुण्याला पाणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

पुणे - रायगड जिल्ह्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीतून पुण्यासाठी दररोज १०० एमएलडी पाणी आणण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर सादर झाला असून, त्यावर प्रशासकीय स्तरावर विचारविनिमय सुरू आहे. या प्रकल्पासाठी २५ किलोमीटरची जलवाहिनी टाकावी लागेल आणि त्यासाठी सुमारे ३७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

पुणे - रायगड जिल्ह्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीतून पुण्यासाठी दररोज १०० एमएलडी पाणी आणण्याचा प्रस्ताव महापालिकेसमोर सादर झाला असून, त्यावर प्रशासकीय स्तरावर विचारविनिमय सुरू आहे. या प्रकल्पासाठी २५ किलोमीटरची जलवाहिनी टाकावी लागेल आणि त्यासाठी सुमारे ३७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 

मुळशी तालुक्‍यातील टाटा धरणातून प्रक्रिया केलेले पाणी रायगड जिल्ह्यातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीत सोडले जाते. ही नदी पुढे अरबी समुद्राला मिळते. त्यामुळे हे वाया जाणारे पाणी जलवाहिनीद्वारे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांपैकी वरसगाव धरणात सोडता येईल. त्यातून महापालिकेला दरवर्षी एक टीएमसी पाणी मिळेल आणि त्यामुळे शहरातील पाच लाख लोकसंख्येचा पाण्याचा प्रश्‍न सुटेल, असे या प्रस्तावात नमूद केले आहे. 

भामा आसखेड धरणातील पाणी सुमारे ४० किलोमीटर जलवाहिनीद्वारे आणायच्या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. त्यातून महापालिकेला दररोज सुमारे २०० एमएलडी पाणी मिळणार असून त्यासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च येणार आहे. त्या धर्तीवर कुंडलिका नदीतून जलवाहिनीद्वारे पाणी आणता येईल. त्यासाठी रस्त्याच्या कडेने जलवाहिनी टाकली, तर भूसंपादनाचा प्रश्‍न उद्‌भवणार नाही, असेही प्रस्तावात म्हटले आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह काही सदस्यांपुढे पाण्याच्या क्षेत्रात काम करणारे अभय गोडसे यांनी या प्रस्तावाचे नुकतेच सादरीकरण केले. मोहोळ यांनी हा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडे दिला आहे. 

शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ शकते. कुंडलिका नदीतून दरवर्षी सुमारे ३० टीएमसी पाणी समुद्रात जाते. हे पाणी फक्त २५ किलोमीटरची जलवाहिनी टाकून वरसगाव धरणात आणता येईल. त्यासाठी पंपिंग स्टेशन बांधावी लागणार आहेत. तसेच हे पाणी वापरून निर्माण झालेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुन्हा ते मुंढवा जॅकवेलद्वारे शेतीसाठी पुढे सोडता येईल, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. 

गरजेनुसार पाणी
चार इंचाची जलवाहिनी टाकून दररोज एक एमएलडी पाणी शहरात आणण्यासाठी सुरवातीला पथदर्शी प्रकल्प राबविता येईल. त्याचे काम सुमारे सात महिन्यांत पूर्ण होईल आणि त्यासाठी महापालिकेला सुमारे ३० कोटी रुपये खर्च करावा लागेल. पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यास शहराच्या गरजेनुसार पाणी आणता येईल, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. 

Web Title: Kundalika river water Proposal