कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत रिएक्टरचा स्फोट; तीन कामगार जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kurkumbh industrial colony reacter blast

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शोगन ऑरगॅनिक्स कंपनीत दुपारच्या सुमारास रिऍक्टरमध्ये केमिकलची रासायनिक प्रक्रिया चालू असताना अचानक स्फोट झाल्याने आग लागली.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत रिएक्टरचा स्फोट; तीन कामगार जखमी

कुरकुंभ - दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शोगन ऑरगॅनिक्स लिमिटेड कंपनीत रासायनिक प्रक्रिया चालू असताना अचानक रिएक्टरचा स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगार जखमी झाले असून सुदैवाने जिवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाने परिसरात जोरात हादरा बसला. या घटनेने पुन्हा कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील शोगन ऑरगॅनिक्स कंपनीत दुपारच्या सुमारास रिऍक्टरमध्ये केमिकलची रासायनिक प्रक्रिया चालू असताना अचानक स्फोट झाल्याने आग लागली. आग व धुराचे लोट लांब अंतरावरून दिसतं होते. त्यामुळे कुरकुंभ, पांढरेवाडी परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीत रिऍक्टरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत तीन कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. मात्र जखमी कामगारांची नावे व पत्ता समजू शकला नाही. आग व धुराचे मोठया लोटांमुळे दुर्घटन मोठी दिसत असूनही सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र स्फोटाने कुरकुंभ, पांढरेवाडी परिसराला जोरात हादरा जाणवला.

औद्योगिक वसाहतीत मोठयाप्रमाणात केमिकल कंपन्या असल्याने आग व स्फोट होण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामध्ये अनेक कामगारांना जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. मात्र अशा घटना घडल्यानंतरच वसाहतीतील सुरक्षेबाबत चर्चा होते. पुन्हा मात्र प्रशासन व स्थानिकांकडून दुर्लक्ष केले जाते. हा जीवघेणा त्रास आणखी किती वर्ष सहन करायचा असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. या घटनेने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाच्या संबंधित विभागाने ठोस पावले उचलावीत अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

टॅग्स :punefireworkerblast