जळगाव सुपे येथे श्रमदानाचे तुफान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

उंडवडी - पानी फाउंडेशनचे श्रमदानाचे तुफान रविवारी (ता. १५) जळगाव सुपे (ता. बारामती) येथील माळरानावर सकाळी तब्बल साडेचार तास घुमले. या तुफानात गावच्या माथ्यावर दीड हजार श्रमाच्या पुजाऱ्यांनी हातात टिकाऊ, फावडे, घमेली घेऊन ५० मीटर लांबीच्या २१ सलग समतल चर उत्साहात खोदल्या. निमित्त होते, पानी फाउंडेशन उपक्रमांतर्गत महाश्रमदानाचे.

उंडवडी - पानी फाउंडेशनचे श्रमदानाचे तुफान रविवारी (ता. १५) जळगाव सुपे (ता. बारामती) येथील माळरानावर सकाळी तब्बल साडेचार तास घुमले. या तुफानात गावच्या माथ्यावर दीड हजार श्रमाच्या पुजाऱ्यांनी हातात टिकाऊ, फावडे, घमेली घेऊन ५० मीटर लांबीच्या २१ सलग समतल चर उत्साहात खोदल्या. निमित्त होते, पानी फाउंडेशन उपक्रमांतर्गत महाश्रमदानाचे.

जळगाव सुपे (ता. बारामती) या गावाने यंदा पानी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. वाघवस्ती नजीकच्या माळरानावर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार व जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांच्या उपस्थितीत महाश्रमदानाला सुरवात झाली. या वेळी गावच्या सरपंच रूपाली खोमणे, उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य व आजी-माजी पदाधिकारी व पानी फाउंडेशनचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

या श्रमदानात लाउड स्पीकरवर लावलेल्या ‘तुफान आलंया’...या गाण्यावर ठेका धरत सलग समतल चर, माती बंधारे, दगडी बांध ही कामे तांत्रिक पद्धतीने करण्यात आली.

 या श्रमदानात ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी, शैक्षणिक संकुलातील विविध विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी, तसेच गावातील स्थानिक ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावर दीड हजार स्वयंसेवकांनी ५० मीटर लांबीच्या २१ सलग समतल चर खोदल्या. या कामामुळे मोठ्या प्रमाणात वाहून जाणारी माती व पावसाचे पाणी अडून ते भूगर्भात मुरण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पानी फाउंडेशनचे तालुका समन्वयक पृथ्वीराज लाड व मयूर साळुंखे यांनी दिली.

पदाधिकारी व अधिकारीही श्रमदानात
श्रमदानात ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार, एन्व्हार्यन्मेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, भरत खैरे, बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, उपसभापती शारदा खराडे, पुरुषोत्तम जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र खराडे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, बारामती उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तहसीलदार हनुमंत पाटील आदींनी उत्साहात श्रमदान केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Labor donations in jalgaon supe