नियतीच्या चक्रव्यूहात कोलमडले ‘सरकार’

नियतीच्या चक्रव्यूहात कोलमडले ‘सरकार’

पिंपरी - पाच वर्षांपूर्वी एका बांधकाम साइटवर काम करताना अतिउच्चदाब वीजवाहिनीचा धक्‍का लागला. काही सेकंदात दोन्ही हात अन्‌ पाय निकामी झाले. बिल्डरकडून नुकसानभरपाई अन्‌ सरकारकडून मदत मिळाली नाही. तरीही खचून न जाता त्यांनी पत्नीच्या सोबतीने संसाराचा गाडा रेटून नेण्याचा प्रयत्न केला. त्यातून सावरतो ना सावरतो तोच गेल्या महिन्यात काळाने झडप घातली अन्‌ न्यूमोनियाने पत्नीचा मृत्यू झाला. व्हत्याचे नव्हते झाले. खेळण्याबागळण्याच्या वयात दोन्ही मुलांवर वडिलांची शुश्रूषा करण्याची वेळ आली. आता मुलांना घेऊन जगायचे कसे? त्यांना शिकवायचे कसे? उदरनिर्वाह करायचा कसा? कोण देईल जगण्याचा आधार? ही दर्दभरी कहाणी आहे, थेरगावातील बांधकाम मजूर कालिपद सरकार यांची.

थेरगावमधील सद्‌गुरू कॉलनीमध्ये दहा बाय दहाच्या भाडेतत्त्वावरील खोलीत कालिपद (मूळगाव राणाघाट, जि. नादिया, पश्‍चिम बंगाल) यांनी पत्नी अलकाबरोबर संसार थाटला होता. त्यांना वैशाली आणि जय ही दोन मुले. २०१२ मध्ये उर्से-पाचाणे (ता. मावळ) येथील एका हॉटेलचे बांधकाम सुरू होते. तिथे काळेवाडीतील ठेकेदारातर्फे ते बांधकाम मजूर म्हणून कामाला जाऊ लागले. बांधकामावरून गेलेल्या अतिउच्चदाब वाहिनीचा त्यांना तीव्र झटका बसला. दोन्ही हात व पाय निकामी झाले. कायमचे ९० टक्के अपंगत्व आले. २० एप्रिल २०१२ रोजी घडलेल्या या घटनेमुळे कालिपद यांचे आयुष्य पूर्णतः बदलून गेले. पैशांअभावी पुरेसे उपचार मिळाले नाहीत; पण पत्नी अलका यांची खंबीर साथ मिळाली. संसाराचा गाडा त्या हाकू लागल्या. दररोजचा खर्च भागू लागला; पण नियतीच्या मनात वेगळेच होते. अलका यांना गेल्या महिन्यात न्यूमोनिया झाला आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यूही. कालिपद हतबल झाले. नातेवाइकांनी पाठ फिरवली. खाण्या-पिण्याची आबाळ होऊ लागली. नियतीच्या फेऱ्यात सरकार कुटुंब अडकून पडले. खेळण्याबागळण्याच्या वयात पित्याचा सांभाळ करण्याची, त्यांची शुश्रूषा करण्याची वेळ मुलांवर आली आहे. आईच्या निधनामुळे मुलगी वैशालीच्या खांद्यावर स्वयंपाकाची जबाबदारी आली. सध्या ती दहावीत; तर भाऊ जय आठवीत आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मदतीने वैशालीच्या शिक्षणाचा प्रश्‍न सुटला आहे. जयच्या शाळा शुल्काचा अन्‌ तिघांच्याही उदरनिर्वाहाचा प्रश्‍न कायम आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सरकार किंवा संबंधित ठेकेदार, बांधकाम व्यावसायिकाकडून नुकसानभरपाई मिळाल्यास ‘सरकार’ कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न काहीसा सुटेल, अशी अपेक्षा समाजातून व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com