मरणाच्या भीतीपेक्षा पोटाची खळगी महत्त्वाची

वारजे माळवाडी - वांजळे चौकातील पुलाखाली कामासाठी दररोज भरणारा मजूर अड्डा.
वारजे माळवाडी - वांजळे चौकातील पुलाखाली कामासाठी दररोज भरणारा मजूर अड्डा.

वारजे माळवाडी - हातावरचे पोट आहे साहेब, मिळेल ते काम करावेच लागतं... पुढे काय होईल हे माहीत नाही. मरणाच्या भीतीपेक्षा पोटाची खळगी भरण्यासाठी जिवावर उदार होऊन काम करावे लागते, अशा प्रतिक्रिया आहेत बांधकाम मजुरांच्या..

कोंढवा आणि आंबेगावमध्ये सीमाभिंत पडून मजुरांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. या पार्श्‍वभूमीवर वारजे माळवाडी महामार्ग पुलाखाली रोज भरणाऱ्या मजूर अड्ड्यावरील कामगारांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. रवींद्र जौंजट म्हणाले, ‘‘प्रत्येक इमारतीत बांबूच्या पहाडावर उंचीवर जाऊन काम करावे लागते. मिळेल त्या जागेत राहावे लागते. कुठेही बसून जेवण करावे लागते. अपघातात कुणाचा मृत्यू झाला तर एक-दोन लाख रुपये देऊन प्रकरण मिटविले जाते. मात्र, आमचे कुटुंब उघड्यावर येते. मजुरांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. सुरक्षा वाऱ्यावर सोडावी लागते.

आठऐवजी बारा तास काम करून घेतले जाते. काही ठिकाणी काम करून झाल्यावर शिव्या खाव्या लागतात. पाचशे रुपये ठरले असल्यास तीनशे रुपयेच दिले जातात. ठरलेले पैसे मागितले तर मारही खावा लागतो.’’ 

महादेव काळे म्हणाले, ‘‘मिळेल ते काम करावे लागते. सुरक्षेविषयी बोलले तर आमच्या हातचे काम जाईल म्हणून नाइलाजास्तव ते करावेच लागते. जगण्यासाठी पैसा लागत असल्यामुळे सुरक्षेकडे आम्हालाही दुर्लक्ष करावे लागते.’’ लक्ष्मण बनसोडे म्हणाले, ‘‘अवघड आणि अरुंद जागी जाऊन आम्हाला अनेकदा काम करावे लागते. कधी-कधी त्याची भीती वाटते; पण काम करण्याशिवाय पर्याय नसतो.’’ 

सरकारी किंवा काही मोठ्या ठेकेदाराकडे काम करताना हेल्मेट घालायला दिले जाते; परंतु पोटासाठी पैसा मिळवायचा असल्याने मिळेल ते काम आहे त्या परिस्थितीत करावे लागते, अशी खंत संजय साळवे यांनी व्यक्त केली. ‘काम मिळाले म्हटल्यावर पुढे काय होईल ते आम्हाला माहीत नसते. आजच्या दिवसाची पोटाची खळगी भरली पाहिजे. त्यामुळे कोणतेही काम करावे लागते, असे शिवाजी देवकुळे, शिवाजी कांबळे व नवनाथ टोम्पे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com