देशाच्या नेतृत्वात मुत्सद्देगिरीची कमतरता : पवार

देशाच्या नेतृत्वात मुत्सद्देगिरीची कमतरता : पवार

देहू (पुणे) : "आंतरराष्ट्रीय राजकारणात स्थान अबाधित ठेवायचे असेल, तर कोणत्याही देशाला आर्थिक, लष्करी ताकद आणि निर्णयात्मक स्वतंत्रता बाळगणे महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंची धोरणे आणि मुत्सद्देगिरीने भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे स्थान मिळाले. सध्याच्या भारताच्या नेतृत्वात मुत्सद्देगिरीत कमतरता आणि धोरणे राबविण्याची घाई होत असल्याचे चित्र आहे. त्यातून आशिया खंडातील अनेक देश भारताला पर्याय म्हणून चीनला जवळ करत आहेत," असे प्रतिपादन 'सकाळ'चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांनी बुधवारी (ता. 6) देहू येथे केले.
 
प्रा. रामकृष्ण मोरे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित स्मृती व्याख्यानमालेत 'आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताचे स्थान' या विषयावर पाचवे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव जगताप अध्यक्षस्थानी होते. किरण मांजरे, गजानन चिंचवडे व्यासपीठावर उपस्थित होते. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंहराव, डॉ. मनमोहन सिंग यांनी आखलेली परराष्ट्र धोरणे, त्यांचा झालेला परिणाम, अमेरिका, रशिया, चीन आणि अन्य देशांशी असलेले भारताचे संबंध आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेले स्थान आणि व्यापारातील परिस्थिती यावर पवार यांनी भाष्य केले.
 
ते म्हणाले, "कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाचे परराष्ट्र धोरण काय आहे, यावर अवलंबून असते. त्याचा संबंध व्यापार, उद्योगधंदे यावर होत असतो. 2014 मध्ये देशात मोदी सरकार आले. 2019 पर्यंत जगाची समीकरणे बदलत गेली. जग कोणत्या दिशेने जात आहे, याचा अंदाज बांधणे कठीण होत आहे. मागील पाच वर्षांत भारताच्या आक्रमक नेतृत्व भूमिकेने काहीही मिळवलेले नाही. तर सीमावाद धगधगता ठेवला गेला. नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, मालदीव हे देश चीनला जवळ करू लागले. चीनचा सीमातंटा सुटत नाही. चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला भारताने विरोध केला आहे.

मोदींच्या व्यक्तिगत झगमगटाने वेगवेगळे इव्हेंट सुरू झाले. यातून मोदींच्या मतपेटीला यश आले. मात्र, हातांना काम मिळेना. नव्याने 15 देशांनी आखलेल्या "आरसेप' धोरणालाही भारताने विरोध केला आहे. मात्र, भविष्यात त्यात भारताला सामील व्हावे लागेल. देशाची आर्थिक प्रगती जलद करावी लागेल. कोण नेता आला, या भ्रमातून दूर व्हायला हवे. आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे गरजेचे आहे. तरच आपले स्थान अबाधित असेल." 

संदीप शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सौरभ कंद यांनी आभार मानले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com