अकरा गावात आरोग्य आणि शैक्षणिक सुविधांचा अभाव 

दिलीप कुऱ्हाडे
शनिवार, 11 मे 2019

येरवडा (पुणे) : नव्याने समावेश झालेल्या अकरा गावातील जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र व शाळांची इमारती व मालमत्ता अद्याप पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाला आरोग्याच्या तर शिक्षण विभागाला शैक्षणिक सुविधा देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तर जिल्हा परिषेदेने मालमत्ता महापालिकेच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव

येरवडा (पुणे) : नव्याने समावेश झालेल्या अकरा गावातील जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र व शाळांची इमारती व मालमत्ता अद्याप पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाला आरोग्याच्या तर शिक्षण विभागाला शैक्षणिक सुविधा देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तर जिल्हा परिषेदेने मालमत्ता महापालिकेच्या ताब्यात देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला असून त्याला अद्याप मंजूरी मिळाली नाही.
त्यामुळे या गावातील आरोग्य सुविधा व शैक्षणिक सुविधा कधी मिळणार असा प्रश्‍न येथील नागरिकांना पडला आहे. 

पुणे महानगरपालिकेत लोहगाव, केशवनगर, साडेसतरा नळी, उंड्री, उरूळी देवाची, फुरूसुंगी, शिवणे, आंबेगाव खुर्द, धायरी, आंबेगाव ब्रु. आणि उत्तमनगर या गावांचा समावेश झाला आहे. मात्र दोन वर्षांनंतर सुध्दा अद्याप या गावातील आरोग्य व शाळांच्या इमारतींचा ताबा महापालिकेला मिळाला नाही. त्यामुळे येथील आरोग्य व शैक्षणिक सुविधा देण्यास महापालिकेला अडचण येत आहे. पुणे जिल्हा परिषद विशेषत: येथील आरोग्य केंद्रांत प्रसूतिगृहांसह बाह्यरुग्ण विभाग आणि गरोदरमाता आणि बालकांचे लसीकरणाची सुविधा देत आहेत. मात्र या गावांतील लोकसंख्येचा विचार करता येथील मनुष्यबळ व साधनसामुग्री पुरेशा नाहीत. मात्र या गावांना महापालिकेच्या आरोग्य सुविधा कधी मिळणार असा प्रश्‍न येथील नागरिकांना पडला आहे. 

समावेश झालेल्या अकरा शाळेत जिल्हा परिषेदेच्या इयत्ता पहिले ते सातवी पर्यंतच्या अकरा प्राथमिक शाळेत सहा हजार विद्यार्थी व दीडशे शिक्षक आहेत. येथील इमारत महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या ताब्यात आल्यास येथील मुलांना शैक्षणिक सुविधा देता येणार असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे . 
‘‘अकरा गावातील शाळांच्या इमारती अद्याप ताब्यात आल्या नाहीत. त्या ताब्यात आल्यानंतर या गावांतील विद्यार्थ्यांना महापालिकेच्या सोई-सुविधा दिल्या जातील.’’
- शिवाजी दौंडकर, शिक्षणप्रमुख, शिक्षण मंडळ, पुणे महानगरपालिका

‘‘अकरा गावातील अद्याप आरोग्य उपकेंद्रांच्या इमारती महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात आल्या नाहीत. तरी सुद्धा येथील नागरिकांना शहरी गरीब योजनेचा लाभ दिला जात आहे. इमारती ताब्यात आल्यानंतर मनुष्यबळासह वैद्यकीय सुविधा दिल्या जातील. 
- डाॅ. रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, पुणे महानगरपालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of health and educational facilities in eleven village