गॅस सिलिंडर वितरकांकडे तोलन उपकरणांचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 जानेवारी 2019

येरवडा - शहरातील अनेक गॅस एजन्सींत वजनकाट्यांचा अभाव आहे. त्यामुळे सिलिंडरमध्ये गॅस किती आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. अनेक वितरकांनी अनेक वर्षांपासून काटे मुद्रांकन व तपासणी करून घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. 

येरवडा - शहरातील अनेक गॅस एजन्सींत वजनकाट्यांचा अभाव आहे. त्यामुळे सिलिंडरमध्ये गॅस किती आहे, हे कळत नसल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत. अनेक वितरकांनी अनेक वर्षांपासून काटे मुद्रांकन व तपासणी करून घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे. 

शहरात भारत व हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीसह इंडेन कंपनीचे गॅस सिलिंडर वितरक आहेत. त्यांच्याकडून होम डिलिव्हरी  केले जाते. मात्र, त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे तोलन उपकरणेच नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे सिलिंडरमध्ये अचूक वजनाचा गॅस असल्याची खात्री देता येत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कित्येक ग्राहकांना गॅस सिलिंडरचे वजन करून घेतले जाते, याची माहितीच नाही. 

वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक सीमा बैस म्हणाल्या, ‘‘स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर स्वीकारताना त्याचे सील व्यवस्थित असल्याची खात्री करणे आवश्‍यक आहे. सिलिंडर स्वीकारण्यापूर्वी कर्मचाऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या तोलन उपकरणांवर वजन तपासून पाहणे आवश्‍यक आहे.’’ 

वैधमापनशास्त्र विभागाच्या कायद्याप्रमाणे तोलन उपकरणांची तपासणी व मुद्रांकन न केल्यास त्यांच्यावर खटला दाखल होऊ शकतो; तसेच त्यांच्यावर दंडाची कारवाई होऊ शकते. मात्र आतापर्यंत किती वितरकांवर दंडात्मक कारवाई केली, याची आकडेवारी मात्र वैधमापनशास्त्र विभागाकडे नसल्याचे समजते. 

वजन करून देणे बंधनकारक
गॅस सिलिंडर वजन करून देणे बंधनकारक आहे. वैधमापनशास्त्र विभागातर्फे विशेष अभियानाद्वारे वितरकांकडील तोलन यंत्राची तपासणी केली जाते. सिलिंडरचे वजन करून न दिल्यास ग्राहकांनी नियंत्रण कक्ष ०२२- २२६२२०२२ व ०२०-२६६८३१७६, २६६९७२३२ या दूरध्वनी क्रमांकांवर तक्रारी करण्याचे आवाहन वैधमापनशास्त्र विभागाने केले आहे. 

हरिगंगा सोसायटीत गेल्या अनेक वर्षांपासून भारत व हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलिंडर वितरित केले जातात. मात्र, कधीही कर्मचाऱ्यांच्या हातात तोलन काटे दिसले नाहीत. आता माहिती झाल्यामुळे गॅस सिलिंडर वजन करून घेणार आहे.
- उषा जाधव, रहिवासी, हरिगंगा सोसायटी

Web Title: Lack of weighting equipment for gas cylinders