लडकत, शेख, जानू यांचे अर्ज अवैध 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

पुणे - माहिती दडविल्याच्या कारणावरून कॉंग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे आणि जातप्रमाणपत्रावरून भाजपच्या उमेदवार कल्पना बहिरट यांचा अडचणीत आलेला उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरला. मात्र अपुऱ्या कागदपत्रांमुळे प्रभाग क्रमांक 19 मधील ब गटातील कॉंग्रेसच्या उमेदवार सुनीता लडकत, राष्ट्रवादीच्या नसीमा शेख आणि मनसेच्या उमेदवार वंदना जानू यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. 

पुणे - माहिती दडविल्याच्या कारणावरून कॉंग्रेसचे उमेदवार अविनाश बागवे आणि जातप्रमाणपत्रावरून भाजपच्या उमेदवार कल्पना बहिरट यांचा अडचणीत आलेला उमेदवारी अर्ज अखेर वैध ठरला. मात्र अपुऱ्या कागदपत्रांमुळे प्रभाग क्रमांक 19 मधील ब गटातील कॉंग्रेसच्या उमेदवार सुनीता लडकत, राष्ट्रवादीच्या नसीमा शेख आणि मनसेच्या उमेदवार वंदना जानू यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. 

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत 18,19 आणि 20 हे तीन प्रभाग येतात. या तिन्ही प्रभागांत 265 अर्ज दाखल झाले होते. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 18 मध्ये सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले. या प्रभागातील क आणि ड गटात सर्वाधिक म्हणजे अनुक्रमे 41 आणि 39 अर्ज दाखल झाले होते. आयोगाच्या आदेशानुसार एका व्यक्तीस एकाच गटातून उमेदवारी अर्ज दाखल करता येतो. त्यामुळे अनेक उमेदवारांनी दोन्ही गटांतून अर्ज भरल्यामुळे त्याचा परिणाम छाननीच्या वेळेस झाला. ज्या उमेदवारांनी दोन्ही गटांतून अर्ज भरले आहेत, त्यांना कोणत्या गटातून अर्ज कायम ठेवायचा, याची संधी देण्यात आली. तेथून छाननीच्या कामास विलंब होत गेला. 

त्यानंतर प्रभाग क्रमांक 19 मधील उमेदवार अर्जांवर छाननी सुरू झाली. या प्रभागातील ड गटातून अविनाश बागवे यांच्या उमेदवारी अर्जावर मनसेचे उमेदवार भूपेंद्र शेंडगे यांनी हरकत घेतली. कॉंग्रेसचे अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावर दोन्ही बाजूंच्या वकिलांनी बाजू मांडल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांनी निकाल देत बागवे यांचा अर्ज वैध ठरविला.  265 पैकी 37 अर्ज अवैध ठरले. 

बहिरट यांचा अर्ज वैध 
प्रभाग क्रमांक वीसमधील ब गटातील भाजपच्या उमेदवार कल्पना बहिरट यांच्या जातप्रमाणपत्रावरून मनसेच्या उमेदवार पूनम शिंदे यांनी हरकत घेतली. याच कारणावरून बहिरट यांचे नगरसेवकपद रद्द झाले होते. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी निकाल राखीव ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आधार घेत बहिरट यांना पुन्हा निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यांचा अर्ज अवैध ठरविण्याचा कोणताही अधिकार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना नाही, असा निकाल देत रविवारी सायंकाळी पाच वाजता पाटील यांनी बहिरट यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला. ऍड. प्रताप परदेशी यांनी बहिरट यांची बाजू मांडली.

Web Title: Ladakat, Sheikh application invalid