बालविवाह रोखणाऱ्या महिलेला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

नसरापूर : वेल्हे येथे बालविवाह होत असल्याची तक्रार केल्यावर वेल्हे पोलिसांनी विवाह थांबवला, परंतु संबंधित व्यक्तींवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप महिला कार्यकर्तीने केला आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. 

नसरापूर : वेल्हे येथे बालविवाह होत असल्याची तक्रार केल्यावर वेल्हे पोलिसांनी विवाह थांबवला, परंतु संबंधित व्यक्तींवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप महिला कार्यकर्तीने केला आहे. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. 

महिला कार्यकर्ती ज्योती हेमंत कुबडे यांनी याबाबत तक्रार केली आहे. 6 जून रोजी वेल्हे येथील एका मंगल कार्यालयात 14 वर्षांच्या मुलीचे लग्न 25 वर्षांच्या मुलाबरोबर होत असल्याबाबत पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून सांगितले. त्यानंतर वेल्हे पोलिसांनी येऊन बालविवाह थांबवला. परंतु, हा विवाह आयोजित करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई किंवा गुन्हा दाखल केला गेला नाही. याबाबत त्यांनी पोलिसांना विनंती केली. त्यावर पोलिसांनी, चौकशी करून 15 दिवसांनी गुन्हा दाखल करू, असे उत्तर मिळाल्याचे सांगितले. या दरम्यान विवाह थांबवल्याच्या दुसऱ्या दिवशी विवाह थांबवला म्हणून नवरदेव मुलाचे वडिलांसह इतर दोघे व अनोळखी एक महिला व पुरुष यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपदेखील कुबडे यांनी केला आहे. 

वेल्हे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत वेल्ह्याचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडे माहिती घेतली असता, नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनीवरून बालविवाह थांबवण्यास आम्ही चाललो असता, ज्योती कुबडे या पोलिस ठाण्यात आल्या व आता मंगल कार्यालयात कोणी नाही, विवाह थांबवणार असल्याचे कळाले. त्यामुळे तेथे कोणी आले नाही, असे सांगितले. तरीदेखील पोलिसांनी याबाबत शहानिशा केली. मात्र, तेथे कोणीच नव्हते. कुबडे यांना विवाहाबाबत लग्नपत्रिका किंवा इतर कोणता पुरावा असेल; तर द्यावयास सांगितले. परंतु, त्यांनी दिला नाही. तरीदेखील त्यांच्या तक्रारीनुसार विवाह होणाऱ्या मुला-मुलीच्या आई-वडिलांना भेटून माहिती घेतली. त्यावर दोघांच्या आईवडिलांनी विवाह नाही, परंतु साखरपुडा होणार होता. मात्र, तो आम्ही रद्द केला आहे, असा जबाब दिला आहे.

वेल्ह्याच्या महिला संरक्षण अधिकाऱ्यांनादेखील याबाबत माहिती देऊन त्यांचा अभिप्राय मागवला आहे. सर्व प्रकरणाची माहिती उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. तसेच, कुबडे यांना मारहाण झाल्याबाबत त्यांच्या तक्रारीनुसार बाळू सांगळे, संतोष सांगळे, कैलास बोराणे व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर दाखल आहे. सांगळे यांनीही कुबडे यांनी मारहाण केल्याची तक्रार केली आहे. या परस्पर विरोध तक्रारीचा तपास पोलिस नाईक ए. के. भवारी करत आहेत. 

Web Title: lady preventing child marriage will be beaten