कर्ज देण्याच्या बहाण्याने दोन लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 जानेवारी 2019

पुणे : कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा बहाणा करून तरुणाची तब्बल दोन लाख 31 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे : कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देण्याचा बहाणा करून तरुणाची तब्बल दोन लाख 31 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी जयंत दरेकर (वय 31, रा. शनिनगर, आंबेगाव खुर्द) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना जून ते जुलै 2018 या कालावधीमध्ये एका अनोळखी महिलेने मोबाईलवर फोन केला. आम्ही श्रीराम फायनान्समधून बोलत असून, तुमचे कर्जाचे रेकॉर्ड चांगले आहे. त्यामुळे श्रीराम फायनान्स तुम्हाला कमी व्याजदरामध्ये आठ लाख रुपयांचे कर्ज देऊ शकते, असे सांगत फिर्यादींचा विश्‍वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादीशी संपर्क साधून कर्ज मंजुरीसाठी प्रक्रिया शुल्क व अन्य रक्कम अशा स्वरूपात वेळोवेळी दोन लाख 31 हजार रुपये मोबाईलवरील व्यक्तींनी दिलेल्या बॅंक खात्यामध्ये भरण्यास सांगितले.

त्यानुसार फिर्यादींनी संबंधित रक्कम भरली. त्यानंतर फिर्यादींनी कर्ज मिळण्यासाठी संबंधित व्यक्तींशी फोनद्वारे सातत्याने संपर्क साधला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Web Title: Lakhs of fraud by Fake loan Guarantee