पर्यटकांना खुणावतोय लक्ष्मी धबधबा...

विजय जाधव
सोमवार, 22 जुलै 2019

हिरवा शालू परिधान केलेली वनराई, नयनरम्य निसर्ग, गडकोटांचे डोंगर, खड्डेविरहित रस्ते, प्रशस्त पार्किंग अन्‌ भौतिक सुखांच्या उपलब्धतेसह पोलिसांचे फिरते पथक यामुळे मढे घाटावर पुण्या-मुंबईतील पर्यटक कुटुंबासमवेत मनसोक्‍त वर्षाविहाराचा सध्या आनंद लुटत आहेत.

भोर ः हिरवा शालू परिधान केलेली वनराई, नयनरम्य निसर्ग, गडकोटांचे डोंगर, खड्डेविरहित रस्ते, प्रशस्त पार्किंग अन्‌ भौतिक सुखांच्या उपलब्धतेसह पोलिसांचे फिरते पथक यामुळे मढे घाटावर पुण्या-मुंबईतील पर्यटक कुटुंबासमवेत मनसोक्‍त वर्षाविहाराचा सध्या आनंद लुटत आहेत.

वेल्हे तालुक्‍याच्या पश्‍चिमेला सह्याद्रीच्या डोंगर रांगामधील मढे घाटावरून सुमारे पाचशे फूट उंचावरून पडणाऱ्या लक्ष्मी धबधब्याखाली चिंब भिजण्याची मजा लुटण्यासाठी दररोज हजारो पर्यटक गर्दी करत आहेत.
एका दिवसाच्या आउटिंगसाठी अनेक हौशी पर्यटक फॅमिलीसह मढे घाटाला भेट देत आहेत.

पावसाच्या सरी अंगावर झेलत डोंगरांच्या घाटमाथ्यावरून आणि धबधब्याजवळ सुरक्षित ठिकाणी सेल्फी काढण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू आहे. उंचावरून फेसाळत कोसळणाऱ्या धबधब्याच्या पाण्याचा आवाज अन्‌ पक्ष्यांचा मधुर किलबिलाट पर्यटक हृदयाच्या कुपीत साठवत आहेत. 

घाटावरून तोरणा, राजगड, रायगड आणि वरंधा घाटाच्या डोंगररांगांचेही दर्शन घेऊन, पर्यटक मनाची समजूत काढत परतीच्या प्रवासी लागत होते. 

शाकाहारी व मांसाहारी जेवणाची सोय 
स्थानिक नागरिकांनी भाजलेली मक्‍याची कणसे व भुईमुगाच्या शेंगा, गरमागरम कांदा भजी आणि वडापाव यासोबत शाकाहारी व मांसाहारी जेवणाची व्यवस्था पाहून पर्यटकांचा आनंद द्विगुणीत होतो. सायंकाळी परत फिरताना फक्कड आलेयुक्‍त गवती चहा पिण्याचा आनंद काही वेगळाच मिळतो. 

        अशी घ्या सुरक्षेची काळजी 

  • घाटातील रस्ता अरुंद आणि तीव्र चढ-उताराचा    असल्याने वाहने सावकाश चालवा. 
  • मढे घाटावरील रस्ता पावसामुळे निसरडा झाल्याने माथ्यावर चालताना काळजी घ्या. 
  • धबधब्याखाली भिजण्यासाठी जाण्याचा रस्ता धोकादायक असल्याने लहान मुलांना घेऊन जाऊ नये. 
  •  पोलिसांच्या पाहुणचारापासून दूर राहण्यासाठी मद्यपान टाळावे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lakshmi waterfall hits to tourists