नाट्यवेडा प्रेक्षक गप्प का आहे?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

पुणे - ""नाटककारांचे पुतळे फोडणे, वेगवेगळ्या "सेन्सॉरशिप' लादणे... अशा नाटकाला मारक गोष्टी ज्या-ज्या वेळी घडतात त्याच्याविरोधात आम्ही कलाकार उभे राहतो; पण त्या वेळी आमच्याबरोबर प्रेक्षक का येत नाहीत, का ते आम्हाला साथ देत नाहीत. मग "मराठी माणूस नाट्यवेडा आहे', असे बिरुद यापुढे प्रेक्षकांनी लावून घ्यायला पाहिजे का,'' असा सवाल अभिनेते-दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी उपस्थित केला.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा (कोथरूड) "जीवनगौरव' पुरस्कार अभिनेत्री लालन सारंग यांना मंगळवारी प्रदान करण्यात आला. अभिनेत्री वंदना गुप्ते, नाट्यसमीक्षक डॉ. वि. भा. देशपांडे, परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन, समीर हंपी, सत्यजित धांडेकर आदी उपस्थित होते.

पालेकर म्हणाले, ""मराठी माणूस नाटकावर, साहित्यावर अतोनात प्रेम करतो, असे म्हटले जाते आणि आपण "हो, खरे आहे' म्हणतो. मग "एक तुतारी द्या मज आणूनी' असे म्हणणाऱ्या राम गणेश गडकरींचा पुतळा फोडून अपमान होतो आणि प्रेक्षक सहन करतात. केवळ कलाकार रस्त्यावर उतरतात. ही एकाकी लढाई योग्य नाही. नाट्यसंस्कृतीवर हल्ला होतो त्या वेळी प्रेक्षकांनाही कलाकारांसोबत पुढे यायला हवे.''

नाटकांचा इतिहास नाटकांपुरता मर्यादित नाही. हा सांस्कृतिक इतिहास आहे. तो आपण जतन करायला हवा. नाहीतर तो असाच विरून जाईल. मग आजच्या पिढीला "हे पुतळे फोडा', "नाटकातले हे काढून टाका', "हे आम्हाला मान्य नाही',

हे म्हणायचे गुंड प्रवृत्तीचे धाडस येते, ते इतिहास जतन करून आपल्याला कमी करता येईल. यातून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल, असेही पालेकर यांनी सांगितले. सारंग म्हणाल्या, ""हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला; पण इथवर येण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले. याबाबत मी नाराज नाही. समाधानी आहे.''

रंगभूमीवरच्या "झाशीची राणी'
""सरकारची आणि समाजातल्या मूठभर लोकांची "सेन्सॉरशिप' अशा अडचणीच्या काळात आम्हा कलावंतांना उभे राहण्यासाठी बळ मिळते, ते जुन्या पिढीतील चांगल्या कलावंतांमुळे. त्यापैकीच एक म्हणून आम्ही लालन सारंग यांच्याकडे पाहतो. त्या रंगभूमीवरच्या "झाशीची राणी' आहेत. रंगमंचावरील सहजता, उत्तम अभिनय, त्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास यासोबतच धाडसीपणा-बेधडकपणा त्यांच्याकडे पाहून शिकायला मिळतो. सध्याच्या वातावरणात याची आवश्‍यकता आहे,'' असे वंदना गुप्ते म्हणाल्या.

Web Title: Lalan Sarang