सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लालासाहेब माळशिकारे 

संतोष शेंडकर
मंगळवार, 17 जुलै 2018

सोमेश्वर कारखाना हा राज्यातील नामांकित कारखाना म्हणून ओळखला जातो. या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला पावणेदोन वर्ष उरलेले असताना उपाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे बारामती, पुरंदर, खंडाळा या तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते.

सोमेश्वरनगर - येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी लालासाहेब धनंजय माळशिकारे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर कोऱ्हाळे बुद्रुक नजीक माळशिकारे गोठा या छोट्याशा धनगरवाड्यात जल्लोष करण्यात आला. या निवडीने गट क्रमांक 4 ला व धनगर समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सोमेश्वर कारखाना हा राज्यातील नामांकित कारखाना म्हणून ओळखला जातो. या कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीला पावणेदोन वर्ष उरलेले असताना उपाध्यक्षपदी कोणाची निवड होणार याकडे बारामती, पुरंदर, खंडाळा या तालुक्यातील कारखाना कार्यक्षेत्राचे लक्ष लागून राहिले होते. मावळते उपाध्यक्ष लक्ष्मण गोफणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागी आज सकाळी 10:30 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. कुंभार यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया सुरू झाली.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार लालासाहेब माळशिकारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने 12:30 वाजता ते बिनविरोध निवडून आल्याचे घोषित करण्यात आले. निवडीनंतर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते माळशिकारे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ संचालक राजाराम शिंगटे, संग्रामराजे निंबाळकर, किशोर भोसले, मोहन जगताप, दिलीप थोपटे, दौलत साळुंखे, सचिन खलाटे, महेश काकडे, विशाल गायकवाड, ऋतुजा धुमाळ, हिराबाई वायाळ आदी उपस्थित होते. सुभाष धुमाळ यांनी विषयवाचन केले तर कार्यकारी संचालक राजेंद्र यादव यांनी निवडप्रक्रियेत सहकार्य केले. कारखान्याचे अध्यक्षपद खुल्या गटाकडे कायम असल्याने विधानसभा, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अन्य प्रवर्गाला संधी दिली जाईल असा होरा होता.

याशिवाय यापूर्वी गट क्रमांक एकमधून लक्ष्मण गोफणे, तीनमधून सिध्दार्थ गीते आणि पाचमधून उत्तम धुमाळ यांना उपाध्यक्षपदी संधी मिळाली होती. अध्यक्षपद गट क्रमांक दोनकडे आहे. त्यामुळे गट क्रमांक चार उपेक्षित राहू नये याचीही पक्षश्रेष्ठींनी काळजी घेतली आहे. या निवडीमुळे कोऱ्हाळे बुद्रुक या गावाला रामचंद्र भगत, सुनिल भगत यांच्यानंतर माळशिकारे यांच्या रूपाने तिसऱ्यांदा उपाध्यक्षपद मिळाले आहे. तसेच माळेगावप्रमाणेच सोमेश्वरनेही शेगर व धनगर समाजाला उपाध्यक्षपद देऊन सामाजिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. या निवडीनंतर माळशिकारे गोठा या हजार-बाराशे लोकसंख्येच्या वस्तीवर जल्लोष करण्यात आला. यापूर्वी माळशिकारे यांचे चुलते राजाभाऊ हे काँग्रेसच्या विरोधात बंड करून पंचायत समितीला भाजपाकडून निवडून आले होते. यानंतर माळशिकारे कुटुंबाची दखल घ्यावी लागली होती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Lalasaheb Malshikare as the vice president of Someshwar factory