नावावरील क्षेत्र ऑनलाइनवर गायब

ज्ञानेश्वर रायते
गुरुवार, 20 जून 2019

माझे वडील आता थकले आहेत. त्यांच्या सातबारा उताऱ्यावरूनच नाव उडाल्याने ते हवालदिल झाले आहेत आणि जी आमची चूकच नाही; ती दुरुस्त करण्यासाठी आम्हीच फिरत आहोत, याला काय म्हणायचे?
- संजय गावडे, मेडद, ता. बारामती 

बारामती - महसूल खात्याबाबत गमतीने ‘जे नसेल ललाटी ते लिहील तलाठी’ अशी म्हण बोलली जाते. अर्थात, ते पूर्ण सत्य नाही. पण, कधीकधी असे घडते; जसे बारामती तालुक्‍यातील मेडद गावातील पोपट गावडे यांच्या बाबतीत घडले आहे. त्यांच्या नावावरील खरेदीचे क्षेत्रच ऑनलाइन होताना ‘उडून’ गेले. आता तलाठ्यांकडून झालेली चूक जणू शेतकऱ्याचीच आहे, म्हणून त्याला दुरुस्त करण्यासाठी गेले वर्षभर इकडून तिकडे फिरण्याची वेळ आली आहे.

मेडद येथील पोपट यशवंत गावडे हे गेले वर्षभर तहसीलदार, मंडलाधिकारी, गावातील तलाठ्याकडे चकरा मारत आहेत. २०१५ मध्ये ऑनलाइन सातबाराच्या नावाखाली त्यांचे ४ एकर ३५ गुंठ्यांचे क्षेत्रच चक्क बेवारस झाले. गावडे यांचे वडील यशवंत गावडे यांनी २३ जुलै १९६८ रोजी रीतसर खरेदी केलेले हे क्षेत्र वडिलांकडून वारसाहक्काने कुटुंबीयांकडे व तेथून हक्कसोडपत्रानुसार पोपट गावडे यांच्या नावावर आले. त्याची फेरफारला रीतसर नोंदही झाली. त्यानंतर सातबारा उताऱ्यावरही ती नोंद आली. मात्र, २०१५ नंतर ही नोंद ऑनलाइन संगणकीकरणाच्या प्रक्रियेत उडाली. म्हणजे ही नोंदच गायब झाली. त्यामुळे क्षेत्र ताब्यात असताना व रीतसर मालक असतानाही पोपट गावडे मात्र महसुलाच्या लेखी निराधार झाले. त्याची माहिती मिळाल्यानंतर गावडे यांनी २१ जून २०१८ रोजी तहसीलदारांकडे 
अर्ज केला.

तहसीलदारांनी २२ जून रोजी मंडलाधिकाऱ्यांना पाठविला, मंडलाधिकाऱ्यांनी पाच महिन्यांनंतर त्याची दखल घेत तहसीलदारांना पत्र लिहून गावडे यांच्या सातबाराची दुरुस्ती करण्यासाठी गाव कामगार तलाठ्यांना आदेश करावा, असा अहवाल दिला. गंमत अशी, की तहसीलदारांनी त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१८ रोजी गाव कामगार तलाठ्यांना ‘उचित कार्यवाही’चा आदेश दिला. मात्र, तो आदेश अजूनही अमलात आलेला नाही. या ‘उचित कार्यवाही’च्या प्रतीक्षेत गावडे मात्र चांगलेच चितपट झाले आहेत.

ही घटना २०१५ मधील आहे. मी मेडद गावचा नुकताच पदभार घेतला आहे. जरी तहसील कार्यालयाने मागील वर्षी आदेश दिला असला, तरी कागदपत्रे आता आठवड्यापूर्वी माझ्याकडे आली आहेत. येत्या आठवड्यात पोपट गावडे यांचा सातबारा उतारा दुरुस्त होईल.
- राहुल गुळवे, तलाठी, मेडद


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land Missing on Online

टॅग्स