प्रवाशांनो जरा संभाळून! दिवे घाटात दरडीचा धोका

दत्ता पोपळघट
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

- गेल्या आठ दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने दिवेघाटात दोन ठिकाणी लहान दरडी कोसळल्या आहेत.
- कोसळणाऱ्या दरडींमुळे पर्यटक, प्रवाशांच्य़ा जीवितास धोका
- सकाळने नुकत्याच दिलेल्या वृत्तात घाटात दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली होती ती खरी ठरली.

फुरसुंगी : गेल्या आठ दहा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने दिवेघाटात दोन ठिकाणी लहान दरडी कोसळल्या आहेत. पावसात भिजण्यासाठी, निसर्गानंद घेण्यासाठी रोज पर्यटकांची मोठी गर्दी येथे होते. तसेच या कोसळणाऱ्या दरडींमुळे पर्यटक, प्रवाशांच्य़ा जिवितास धोका निर्माण झाला आहे. सकाळने नुकत्याच दिलेल्या वृत्तात घाटात दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवली होती. ती खरी ठरली असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घाटातील खिळखिळ्या झालेल्या दरडींना तातडीने जाळ्या बसवण्याची गरज निर्माण झाली आहे. 

हडपसर सासवड रस्त्यावरील अवघड व तीव्र वळणांच्या दिवेघाटात डोंगरमाथ्याच्या अनेक ठिकाणच्या दरडी संततधार पावसाने खिळखिळ्या झाल्या आहेत. दोन दिवसात घाटात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. मात्र, त्यांचे प्रमाण लहान असल्याने कुठलीही दूर्घटना घडली नाही व दरडींचा राडारोडाही वाहतूक रस्त्यावर आला नाही. मात्र, येथे खिळखिळ्या झालेल्या व केंव्हाही कोसळू शकतील व मोठी दूर्घटना घडू शकेल अशा अनेक मोठ्या दरडी आहेत. त्या काढून टाकणे किंवा त्यांच्यावर तातडीने जाळ्या बसवणे गरजेचे आहे.पावसामुळे घाटात रोज मोठ्या प्रमाणात पर्यटक, प्रवाशी गर्दी करत असल्याने या सर्वांना या मोठ्या दरडींचा धोका वाढला आहे. 

वाहनांवर दरडी कोसळण्याचा धोकाही वाढला आहे. घाट उतरतानाच्या दूसऱ्या व तिसऱ्या वळणांवर खिळखिळ्या झालेल्या दरडींची संख्या मोठी आहे. त्याचे मोठे दगड कोसळून राडारोडा नेहमी वाहतूक रस्त्यावर येतो व अपघात होतात. पावसाळ्यात घाटात वाहनचालकांना भितीचा सामना करावा लागत आहे. दरडींना जाळ्या लावणे व अन्य उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी अनेक दिवसांपासून केली आहे मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभाग किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यापैकी कुणीही घाटात सुविधा देण्याकडे लक्ष देत नाही. पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती सुरेखा चौरे याबाबत म्हणाल्या,की पालखी मार्ग व मोठ्या वाहतूकीचा रस्ता म्हणून घाटरस्त्याला खुप महत्व आहे.येथे येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षितता व पुरेशा सुविधा मिळणे गरजे आहे. कोसळलेल्या दरडींचा राडारोडाही अनेक दिवस उचलला जात नाही.

संबंधीत विभागाने घाटसुविधेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.घाटात लहानमोठ्या वस्तू विकणारे विश्वनाथ लगड म्हणाले, की आमच्या डोळ्यासमोर अनेकदा दरडी कोसळत असतात, मात्र संबंधीत अधिकारी इकडे कधी आलेले व राडारोडा उचलणे किंवा साफसफाईची कामे होताना कधी पाहिले नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांशी याबाबत संपर्क साधायचा प्रयत्न केला असता संपर्क होउ शकला नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Land Slide in dive ghat