भूमिपूजनांची लगीनघाई

Land worship
Land worship

पुणे - पुणेकरांचे जीवनमान उंचाविण्याची आशा दाखवून निवडणुकांआधी भारतीय जनता पक्षाने महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची घोषणा केली; मात्र, अंमलबजावणीच्या पातळीवर हे प्रकल्प फारसे पुढे सरकले नाहीत. त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर ते प्रत्यक्षात उतरविण्याची घाई भाजप करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे २६ जानेवारीपूर्वी प्रकल्पांची भूमिपूजने- उद्‌घाटने ‘आटोपण्याचा’ आदेश नेतृत्वाने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे १५ विकासकामे मार्गी लावण्याचे आव्हान सत्ताधाऱ्यांना पेलावे लागणार आहे. परिणामी, पुढील दोन महिने विकासकामांची लगीनघाई होणार असल्याचे स्पष्ट आहे. 

नदीसुधार (जायका), पंतप्रधान आवास योजना, स्मार्टसिटी, स्वारगेट ते शिवाजीनगर मेट्रो (भुयारी मार्ग) आदी प्रकल्प मार्गी लावावे लागणार आहेत. निवडणुकांच्या आधीच बहुतांशी प्रकल्पांची कामे सुरू होतील. त्यावरील कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचा दावा सत्ताधारी भाजपचा आहे. मात्र, काही प्रकल्प अजूनही चर्चेत राहिल्याने ती मार्गी लागण्याची शक्‍यता अजिबात नाही. 

लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्‍वासनांची आठवण भाजपला आता होऊ लागली आहे. महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीआधी रेंगाळलेले महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात येतील, असा शब्द या पक्षाच्या नेत्यांनी दिला होता. प्रत्यक्षात, मात्र गेल्या दीड वर्षात विकासकामांचा आलेख उंचाविण्यात या मंडळींना यश आले नाही. परिणामी, येत्या दोन-सव्वादोन महिन्यांत निविदा प्रक्रिया राबवून कामे सुरू करण्याचे फर्मान नेतृत्वाने सोडले आहे. नदीसुधार योजनेसाठी सल्लागार नेमला तरी, योजना रखडली आहे. पंतप्रधान आवास योजनेला स्थायी समितीची मंजुरी मिळाली; परंतु, त्यानंतरची कार्यवाही होत नाही. तेव्हाच स्मार्टसिटी, शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रोमार्गाचेही भूमिपूजन करण्याचे नियोजन आहे. समान पाणीपुरवठा योजनेतील जलवाहिन्या आणि मीटरचे कामही पुढे नेण्याचे आव्हान राहणार आहे. 

अर्थसंकल्पाला फटका बसणार 
महापालिकेतील सत्ताधारी भाजपने आपला दुसरा अर्थसंकल्प सुमारे ५ हजार ३९२ कोटी रुपयांचा मांडला. त्यातही काही प्रमुख योजनांचा समावेश असून, त्यांच्या निविदा आणि कामाचा आदेश जानेवारीनंतर निघण्याची शक्‍यता आहे. मात्र, याच काळात आचारसंहिता लागू झाल्यास अर्थसंकल्पाला त्याचा फटका बसणार आहे. या पार्श्‍वभूमीवर अर्थसंकल्पाची शंभर टक्के अंमलबजावणी करू, असा निर्धार करणाऱ्या भाजपला तेही जमणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

नियोजित प्रकल्पांची कामे हाती घेतली असून, ते मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. पंतप्रधान आवास योजना, नदीसुधार, एचसीएमटीआर आणि वाहतुकीसंदर्भातील अन्य प्रकल्पही आता मार्गी लागतील. त्यासाठी निधी आणि गरज याचा विचार करून प्रकल्प उभारणीचे नियोजन झाले आहे. ही कामे दीड वर्षापासून करण्यात येत आहेत. 
- मुक्ता टिळक, महापौर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com