Landing big planes in lohgaon airport in pune
Landing big planes in lohgaon airport in pune

लोहगावात मोठ्या विमानांचेही लॅंडिंग! 

पुणे : लोहगाव विमानतळावर बोइंग, एअरबस यांसारख्या मोठ्या आकाराच्या विमानांनाही उतरता येईल, या दृष्टीने विचार सुरू आहे. यासाठी विमानतळाच्या धावपट्टीचे पश्‍चिमऐवजी पूर्वेच्या बाजूने विस्तारीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे धावपट्टीची लांबी तब्बल नऊशे मीटरपर्यंत वाढणार आहे. 

विमानतळ विस्तारीकरणाबाबत पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी बोलावलेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. या कामासाठी ओएलएफ (ऑप्टिकल लॅण्ड सर्व्हे) करून घेण्याचा निर्णयही या वेळी घेण्यात आला. हा सर्व्हे एका महिन्यात पूर्ण करून त्यानंतर धावपट्टीचे विस्तारीकरण कोणत्या दिशेने करावयाचे, याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

विमानतळाच्या पश्‍चिमेकडील बाजूस धावपट्टीचे विस्तारीकरण करावे, असा आग्रह एअरफोर्सने धरला होता; परंतु पश्‍चिम बाजूस विस्तारीकरण केल्यास धावपट्टीची लांबी केवळ दोनशे ते तीनशे मीटरने वाढू शकते. तसे झाल्यास मोठी विमाने उतरण्यास त्याचा फायदा होऊ शकणार नाही. या उलट पूर्वेकडील बाजूस धावपट्टीचे विस्तारीकरण केल्यास धावपट्टीची लांबी सुमारे 900 मीटरपर्यंत वाढू शकते. त्यामुळे मोठ्या आकाराची विमाने उतरविणे शक्‍य होऊ शकते, अशी सूचना एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने केली होती. 


एअरपोर्ट ऍथॉरिटीने केलेल्या सूचनेनुसार बैठकीत चर्चा झाली. धावपट्टीचे पूर्वेकडील बाजूस विस्तारीकरण केल्यास दोनशे ते अडीचशे एकर जागा लागू शकते. विमानतळाच्या सीमाभिंतीपासून 900 मीटर परिसरात बांधकामांना परवानगी नाही. त्यामुळे ही जागा संपादित करणे शक्‍य आहे. तसेच, धावपट्टीच्या विस्तारीकरणास जागा योग्य आहे, यावर बैठकीत एकमत झाले. मात्र, या दिशेने विस्तारीकरण करण्यात, तसेच विमानोड्डाणात अडथळा येणार नाही, याची खात्री करून घेण्यासाठी ओएलएफ सर्व्हे करून घेण्याचे बैठकीत ठरले. या सर्वेक्षणानुसार पूर्वेकडील बाजूस धावपट्टीचे विस्तारीकरण करणे शक्‍य असल्याचे स्पष्ट झाल्यास पुढील प्रक्रिया राबविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

या वेळी खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह एअरपोर्ट ऍथॉरिटीचे अधिकारी उपस्थित होते. 

विमानतळ विस्तारीकरणास गती देण्यासाठी बैठक बोलविली होती. त्यामध्ये धावपट्टीचे विस्तारीकरण, विमानतळाच्या परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि विमानतळ इमारतीच्या विस्तारीकरणासंदर्भात चर्चा झाली. 
गिरीश बापट, पालकमंत्री 

पूर्वेकडून विस्तारीकरण 
केल्यास धावपट्टीची लांबी 
900 मीटर 

पश्‍चिमेकडून विस्तारीकरण 
केल्यास धावपट्टीची लांबी 
200 ते 300 मीटर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com