बोरघाटात दरड कोसळली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

लोणावळा - पुणे-मुंबई लोहमार्गावर बोरघाटातील खंडाळा ते मंकी हिलदरम्यान शुक्रवारी (ता. 24) सकाळी दरड कोसळली. कर्जतच्या दिशेने निघालेल्या रेल्वेच्या इंजिनपुढे (बॅंकर) ही दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. 

लोणावळा - पुणे-मुंबई लोहमार्गावर बोरघाटातील खंडाळा ते मंकी हिलदरम्यान शुक्रवारी (ता. 24) सकाळी दरड कोसळली. कर्जतच्या दिशेने निघालेल्या रेल्वेच्या इंजिनपुढे (बॅंकर) ही दरड कोसळली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. 

सध्या लोणावळा व खंडाळा परिसरात पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याची शक्‍यता असते. खंडाळा घाटात रेल्वे किलोमीटर क्रमांक 121 जवळ बोगद्याच्या अलीकडे मिडल लाइनवर काही दरडी इंजिनापुढे व काही दरडी रुळांवर आल्या. मात्र, पुणे-मुंबईदरम्यान रेल्वेची डाऊन आणि अपलाइन सुरू असल्याने वाहतूक फारशी विस्कळित झाली नाही. रेल्वे कर्मचारी, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मार्गावरील दरडी दूर केल्या. मात्र, बोरघाटात रुळांवर दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने रेल्वे प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे 
गेल्या या वर्षी जानेवारीपासून बोरघाटात लोहमार्गावर दरड कोसळण्याची ही आतापर्यंतची सहावी घटना आहे. काही घटनांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांसह तीन जणांना आले प्राण गमवावे लागले आहे. याचबरोबर बोरघाटात बोगद्याच्या तोंडावर दरडी पडण्याच्या व लोहमार्ग खचण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी रेल्वे मार्गावर दरड पडल्याने हैदराबाद एक्‍स्प्रेसचे इंजिन घसरले होते. हुबळी एक्‍स्प्रेसमधील दोन प्रवाशांना जीव गमवावा लागला होता. बोरघाटात मालगाडीचे डब्बे घसरण्याचा प्रकारही झाला होता. रेल्वेच्या वतीने दरडींवर उपाययोजना करण्यात येत असल्याची माहीती देण्यात येत असली तरी घाटमार्गातील धोकादायक ठरणाऱ्या दरडींचे कित्येक वर्षे सर्व्हेक्षणच झाले नसल्याची बाब पुढे येत आहे. कोकण व घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडतो आहे. यामुळे घाटात दरडी कोसळण्याचे संकट कायम असल्याने रेल्वे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे आहे.

Web Title: Landslide collapsed in borghat