दरडींवर आच्छादनाचे काम संथ

बोरघाट, खंडाळा - डीसी हायस्कूलजवळ डोंगरमाथ्यावर लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकण्यात येत आहे.
बोरघाट, खंडाळा - डीसी हायस्कूलजवळ डोंगरमाथ्यावर लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकण्यात येत आहे.

लोणावळा - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा घाटात दरडींवर उपाययोजना व लोखंडी जाळ्या बसविण्याचे काम अद्यापही प्रगतिपथावर आहे. सध्या खंडाळा एक्‍झिटपासून ड्युक्‍स हॉटेल, डीसी हायस्कूलजवळ लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकण्याचे काम रस्ते विकास महामंडळाने सुरू केले आहे. 

द्रुतगती मार्गावरील मुंबईकडील एक लेन सध्या वाहतुकीसाठी बंद आहे. त्याचा वाहतुकीवर फारसा परिणाम झालेला नाही. गेल्या काही वर्षांमध्ये द्रुतगती मार्गावर सातत्याने दरडी पडण्याच्या घटना घडल्याने घाटातील प्रवास असुरक्षित झाला होता. या पार्श्‍वभूमीवर रस्ते विकास महामंडळाच्या वतीने शेकडो कोटी रुपये खर्चून भातण, आडोशी आणि खंडाळा बोगदा, अमृतांजन पुलाजवळ धोकादायक दरडी पाडण्याच्या कामाबरोबर दरडींवर लोखंडी जाळ्यांचे आच्छादन टाकण्यात आले. यासाठी परदेशी तंत्रज्ञांचीही मदत घेतली. तसेच पावसाळ्यात महामंडळाने घाटातील दरडींवर लक्ष ठेवण्यासाठी घाट ऑब्झर्वेशन टीम तैनात केली होती. 

खर्च सव्वाशे कोटी 
टप्प्याटप्प्याने हे काम सुरू असून सुमारे एक किलोमीटरच्या अंतरासाठी अंदाजे सव्वाशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरडी पाडल्यानंतर तेथे काँक्रिटचा थर व जाळ्याचे आच्छादन बसविण्याचे काम सुरू असून, या पूर्वी सुमारे ८०० मीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित सुरू आहे. 

पुन्हा होणार पाहणी
बोरघाटातील दरडींचे काम पूर्ण झालेल्या ठिकाणी आयआरबी कंपनी, रस्ते विकास महामंडळाच्या तज्ज्ञ पथकातर्फे पुन्हा एकदा पाहणी करण्यात येईल. त्यानंतर आवश्‍यकता वाटल्यास सुधारणा करून काही दिवसांत महामार्ग संरक्षित करण्यात येईल. 

काम सुरूच राहणार
शंभर टक्के काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी दरडींवर उपाययोजना करण्याचे काम सुरूच राहणार आहे. खंडाळा बोगदा, आडोशी बोगद्यानजीक एक-दोन ठिकाणी किरकोळ कामे शिल्लक असून ती लवकरच उरकली जातील, असे रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

भीती कायम
द्रुतगती मार्गावर रोज साधारणपणे ९० हजार वाहने प्रवास करतात. धोकादायक दरडींबरोबर धोकादायक वाहतुकीचा प्रश्‍नही ऐरणीवर असून, सर्व यंत्रणा सजग असूनही वाहनचालकांच्या मनातील भीती कायम आहे. लूज स्केलिंगच्या कामामुळे डोंगरमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर ड्रिलिंग केले गेले आहे. त्यावर जाळीच्या आच्छादनाबरोबर काँक्रीटचा थर चढवण्यात येत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com