पुण्यात मराठे दौडले लाखो..!

सुनील माळी : सकाळ वृत्त्तसेवा
रविवार, 25 सप्टेंबर 2016

विविध ध्वज 

वेगवेगळ्या आकाराचे ध्वज घेऊन माणसे मोर्च्यात आली होती. काही ध्वजांवर शिवछत्रपतींची रुबाबदार आणि देखणी छबी होती. त्यात ‘छत्रपती‘, ‘छत्रियकुलावतंस‘ असा त्यांचा उल्लेखही करण्यात आला होता. हे ध्वज मोठ्या अभिमानाने मिरवत मिरवत मुख्यतः तरुणवर्ग चालला होता. ‘एक मराठा, लाख मराठा‘, ‘मी मराठा‘ असे लिहिलेल्या टोप्या अनेकांनी घातल्या होत्या. त्यातील काही पांढऱ्या तर काही भगव्या होत्या. महिलांच्या गळ्यात भगवी उपरणी दिसत होती.

पुणे : धरणातून पाणी न सोडताही आज मुठा नदी वाहू लागली... नदीचे काठ भगवे झाले... जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यांतून लाख-लाख भगवे ध्वजधारी मराठे पुण्यास लोटले अन्‌ नदीपात्रापासून सकाळी सुरू झालेली भगवी लाट लक्ष्मी रस्त्याने विधान भवनाकडे लहरत गेली... कोपर्डी बलात्काराचा निषेध करण्यासह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी निघालेला हा मोर्चा पुण्यातील मोर्च्याचेच नव्हे तर कोणत्याही कार्यक्रमास जमलेल्या जनसागराचे आतापर्यंतचे विक्रम मोडीत काढणारा ठरला. 

 

पुण्यामध्ये आज ही भगवी लाट थडकणार होती, पण तिची चाहूल काल सायंकाळपासूनच लागली होती. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांतून वाहनांतून माणसे येण्यास सुरवात झाली होतीच. आज पहाटेच पुण्याच्या विविध दिशांना जाग आली आणि मिळेल त्या वाहनाने जिल्ह्याच्या सर्व तालुक्‍यांतून माणसे पुण्यात येऊन थडकू लागली. अर्थात, त्यांच्या येण्यात शिस्त दिसत होती. प्रत्येक दिशेने पुण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या चौकाचौकांत त्यांचे स्वागत चहा-बिस्किटे यांनी होत होते. प्रत्येक ठिकाणी विशिष्ट रंगाचे टी शर्ट घातलेले कार्यकर्ते त्यांना मदत करत होते. प्रत्येक दिशेने येणाऱ्या रस्त्यावरील वाहनांसाठी पार्किंग नेमके कुठे आहे, याचे दिशादर्शक फलकही लावण्यात आलेले होते. या पार्किंगमध्येही स्वयंसेवक होते. प्रत्येक तालुक्‍यासाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था होती आणि त्याची माहिती त्या त्या तालुक्‍यातून येणाऱ्यांच्या फोनवर होती. 

 

मोर्च्याची सुरवात डेक्कन जिमखाना भागातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाली. त्याची माहिती ध्वनिक्षेपकांद्वारे प्रत्येक चौकात गर्दी करून उभ्या असलेल्यांना कळत होती आणि मोर्च्याला सुरवात झाल्याचे समजताच प्रत्येक चौकात टाळ्यांचा कडकडाट होत होता. मोर्च्याच्या अग्रभागी महिला असण्याचे नियोजन होते. संभाजी महाराजांच्या पुतळ्यास मुलींच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला आणि मोर्च्याला साडेदहा वाजता सुरवात झाली. मोर्च्याला सुरवात झाल्यानंतरही शहराच्या चारही बाजूंनी लोक मोर्च्यात सहभागी होत होतेच. मोर्चा खंडोजीबाबा चौकात आला तेव्हा कर्वे रस्ताही फुलून गेला होता. प्रथम संभाजी पुलाच्या एकाच बाजूने मोर्चा पुढे निघाला आणि काही वेळाने दुसऱ्या बाजूनेही मोर्च्यात येण्यास परवानगी देण्यात आली. त्या वेळी संभाजी पूल पूर्णपणे भगवामय झाला होता. 

 

प्रमुख नेत्यांची हजेरी 

खासदार उदयनराजे, छत्रपती संभाजीराजे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्याबरोबरच स्थानिक नेते, नगरसेवकही मोर्च्यात सहभागी झाले होते. त्यात सर्वच प्रमुख पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. महापौर प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष विनायक निम्हण, चंद्रकांत मोकाटे आदीही मोर्च्यात आले होते. माजी खासदार अशोक मोहोळ, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी अंकुश काकडे, चेतन तुपे, विकास दांगट आदींचाही त्यात समावेश होता. 

 

विविध फलक 

कोपर्डी बलात्कार प्रकरणातील नराधमांना फाशी द्या, अशी मागणी करणारे फलक मोर्च्यात जागोजागी दिसत होते. त्यात प्रामुख्याने मुलींचा समावेश होता. त्याचप्रमाणे शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशीही मागणी फलकांद्वारे करण्यात आली. त्यासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख मांडण्यासाठी एक कार्यकर्ता फास गळ्याभोवती बांधून मोर्च्यात आला होता. ऍट्रॉसिटी कायदा रद्द करावा, तसेच त्यात बदल करावा, अशी मागणी करणारे फलकही मोर्च्यात होते. शिवस्मारकाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली. पुण्यात आलेल्या काही परदेशी महिलाही कुतूहलाने मोर्चा पाहत होत्या.

Web Title: Large gathering for Maratha Kranti Morcha in Pune