हवेली, भोर, इंदापूर, पुरंदर, शिरूरमध्ये कोरोनाचे थैमान 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 July 2020

पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. हवेली, भोर, इंदापूर, पुरंदर, शिरूर तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजही मोठी वाढ झाली आहे. हवेली व इंदापूर तालुक्यात दिग्गज नेत्यांना कोरोनाने घेरले आहे. 

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. हवेली, भोर, इंदापूर, पुरंदर , शिरूर या तालुक्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत आजही मोठी वाढ झाली आहे. हवेली व इंदापूर तालुक्यात दिग्गज नेत्यांना कोरोनाने घेरले आहे. 

लोणी काळभोर : उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीत मागिल चार दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र निर्माण झाले असतानाच कोरोनाने पूर्व हवेलीकरांना गुरुवारी (ता. ३०) पुन्हा एकदा दे धक्का दिला. सत्ताधारी पक्षाच्या एका जिल्हा पातळीवरील एका पदाधिकाऱ्यासह पूर्व हवेलीमधील विविध ग्रामपंचायत हद्दीत गुरुवारी दिवसभरात कोरोनाचे नव्याने वीस रुग्ण आढळून आले आहेत.

खडकवासला प्रकल्पात निम्म्याहून कमी साठा

पूर्व हवेलीमधील उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती या तीन प्रमुख ग्रामपंचायत हद्दीत चार दिवसाच्या विश्रांतीनंतर कोरोनाने पुन्हा एकदा गांधळ घालण्यास सुरुवात केली असून, वरील तीन ग्रामपंचायत हद्दीतील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा अडीचशेवर पोचला आहे. तर, वरील तीन ग्रामपंचायत हद्दीत सत्तरहून अधिक अॅक्टीव्ह कोरोनाबाधीत रुग्ण असून, विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. लोणी काळभोर येथील कोविड केअस सेंटरमधुन बुधवारी (ता. २९) पाठवलेल्या ८० हुन अधिक जनांचे स्वॅब (घशातील द्रव) तपासनी अहवाल येणे बाकी आहे. 

सासवड  : पुरंदर तालुक्यात गेल्या चोवीस तासात मिळून 32 कोरोनाबाधीत रुग्णांची भर पडली; त्यातून तालुका पाच शतकी आकडा पार करीत रुग्ण संख्येत 526 वर पोचला. सासवड शहरात सहा रुग्णांसह रुग्ण संख्या 253 वर पोचली. आजच्या 32 रुग्णात सासवड व जेजुरीचे मिळून शहरी भागातील 12 रुग्ण आणि ग्रामीण भागातील तब्बल 20 रुग्ण आहेत.  

बारामतीत कोरोनाचा बारावा बळी

दरम्यान, चोवीस तासात आज सासवड व जेजुरी प्रत्येकी सहा बाधीत रुग्णांसह सोनोरी आठ, माहूर तीन आणि दिवे, सिंगापूर, गुरोळी, पारगाव,  जेऊर, वाल्हा, नीरा, कोथले आणि परिंचे प्रत्येकी एक  रुग्ण पाॅझीटिव्ह आढळून आले. तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी याबाबत माहिती दिली. आजअखेर तालुक्यातील तब्बल 51 गावे कोरोनाबाधीत झाली आहेत.

इंदापूर : इंदापूर तालुक्यात आज एकूण १३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यामध्ये निमगाव केतकी येथील तालुकास्तरीय वजनदार राजकीय नेत्याचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार सोनाली मेटकरी व उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे यांनी दिली. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आज कोरोनाबाधित आलेल्या भिगवण येथील 84 वर्षाच्या जेष्ठ नागरिकाचा इंदापूर कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाला आहे. तालुक्यातील एकूण 40 नागरिकांच्या घश्यातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. त्यामध्ये सणसर येथील एकाच कुटुंबातील 8 जण आज सकाळी कोरोनाबाधित असल्याचे आढळले, तर आज दुपारी निमगाव केतकी येथील 3, कळाशी येथील 1 व भिगवण येथील 1 जण कोरोनाबाधीत आढळला. 

भोर : भोर शहरात पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर कोरोनाने पुन्हा प्रवेश केला असून, शहरात आज कोरोनाचे तीन रुग्ण आढळून आले. याशिवाय तालुक्यातील गोकवडी, शिंदेवाडी व तांभाड येथे प्रत्येकी १ रुग्ण कोरोनाग्रस्त आढळला असल्याची माहिती तालुक वैद्यकीय अधिकारी डॉ सूर्यकात कऱ्हाळे यांनी दिली. त्यामुळे भोर शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २० झाली आहे. परंतु, १७ पॉझिटीव्ह रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील तीनपैकी दोघेजण गोकवडी येथील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ महिलेच्या संपर्कात आले होते. तर, मृत महिला उपचारासाठी आलेल्या भोरमधील खासगी दवाखान्यातील कर्मचारी महिलेलाही (मावशीला) कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधीत इमारत व दवाखान्याचा परिसर सील केला आहे.

भोर शहरात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांचा परिसर हा मायक्रो कॉन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. परंतु, सध्याचा लॉकडाउन ३१ जुलैला संपल्यानंतर १ ऑगस्टपासून कोरोनाग्रस्तांचा शहरातील भाग व परिसर वगळता इतर ठिकाणची दुकाने सुरु राहणार असल्याचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांनी सांगितले. इतर ठिकाणची दुकाने ही सकाळी ९ ते सायंकाळी ७ या वेळेत अटी व शर्थीं राखून उघडी राहतील. यासाठी सर्व नागरिकांनाही शासनाच्या नियमांचे कडक पालन करावे लागणार आहे.

शिरूर : शिरूर तालुक्यातील कोरोनाबाधितांनी आज चारशेचा टप्पा गाठला. शहरासह तालुक्यातील १५ गावांमध्ये आज एकूण २२ रूग्ण आढळले असताना केंदूर येथे एका बाधिताचा मृत्यू झाला. शिरूर शहर व तालुक्याच्या विविध भागातील १७ बाधितांच्या संपर्कातील ८४ जणांच्या स्वॅबचे नमूने दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या शासकीय लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी एकूण २२ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. आता या २२ जणांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅबचे नमूने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले जाणार असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. 

आज दिवसभरात शिरूर शहरातील गुजर मळा येथील ३६ वर्षीय महिला व विठ्ठल नगर येथील पन्नास वर्षीय कामगार अशा दोघांचे़ कोरोना तपासणीचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले, तर शिरूर पंचक्रोशीतील तर्डोबाचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील एकाचा आणि शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले; त्याचबरोबरच तालुक्यातील रांजणगाव गणपती व कोरेगाव भीमा येथील प्रत्येकी दोघांचे आणि शिक्रापूर, सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, वाघाळे, मांडवगण फराटा, सादलगाव, गणेगाव दुमाला, केंदूर, जातेगाव व पिंपळे धुमाळ येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. शिरूर तालुक्यात आतापर्यंत ३२२, तर शहरातील ७८ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, आजअखेर १७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या आजच्या आक्रमणाचा फटका १५ गावांतील २२ जणांना बसला. बाधित चारशेजणांपैकी १५० च्या वर रूग्ण ठणठणीत होऊन घरी परतले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Large increase in the number of corona patients in Pune district