पोषण आहारात सापडल्या अळ्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

पुण्यातील नूमवि (मुलांच्या) शाळेत आज शालेय पोषण आहारात अळ्या निघाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांना उलटी झाली. याबाबत मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे यांनी अळी निघाल्याचे मान्य केले असून, आहार पुरवठादाराकडे खुलासा मागितला आहे.

पुणे- पुण्यातील नूमवि (मुलांच्या) शाळेत आज शालेय पोषण आहारात अळ्या निघाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे. यामुळे काही विद्यार्थ्यांना उलटी झाली. याबाबत मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे यांनी अळी निघाल्याचे मान्य केले असून, आहार पुरवठादाराकडे खुलासा मागितला आहे.

शाळेत दुपारच्या वेळी पोषण आहार आल्यानंतर विद्यार्थ्यांना तांदळाची खिचडी खाण्यास देण्यात आली. त्यांनी खाण्यास सुरवातही केली. मात्र काही वेळाने सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये अळ्या निघाल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी खाणे थांबविले. अळी निघाल्याने काही विद्यार्थ्यांना किळस वाटू लागल्याने त्यांना उलटी झाली. त्यानंतर काही विद्यार्थी अळी असलेली खिचडी घेऊन मुख्याध्यापिका ओमासे यांच्याकडे गेले होते. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नाही. 

ओमासे यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्या म्हणाल्या, ‘‘अन्नामध्ये एक अळी दिसून आली आहे. विद्यार्थ्यांना कोणताही त्रास झालेला नाही. सध्या शालेय पोषण आहार हा सेंट्रल किचनमधून येतो. शाळेत तयार केला जात नाही. हा प्रकार गंभीर असल्याने त्याविषयी 

शहा या पुरवठादाराकडे विचारणा केली आहे. त्यांनी तांदूळ खराब असल्याचे कारण दिले आहे. याबाबत महापालिकेलाही कळविण्यात येत आहे. असे प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात येईल.’’

पुरवठादाराला कारणे दाखवा
प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर त्यांनी पुरवठारास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे सांगितले. पुरवठादार महेश शहा यांना मोबाईलवर संपर्क केला असता, त्यांनी तांदूळ खराब असल्याचे सांगितले. तांदूळ खराब होता, तर शिजवला का आणि अळी कशी निघाली, अशी विचारणा केली असता, त्यांनी चूक झाल्याचे मान्य केले. शिक्षण मंडळाकडून तांदूळ बदलून घेणार असल्याचे ते म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Larvae found in food in NMV school