निर्णय सरकारचा; श्रेय मात्र माझे

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 सप्टेंबर 2019

राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित काही निर्णय घेतले. याबाबतचे फ्लेक्‍स सध्या शहरभर झळकत असून, त्यावर केवळ भाजपच्याच नेत्यांचीच छबी पाहायला मिळत आहे.

पिंपरी - राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड शहराशी संबंधित काही निर्णय घेतले. याबाबतचे फ्लेक्‍स सध्या शहरभर झळकत असून, त्यावर केवळ भाजपच्याच नेत्यांचीच छबी पाहायला मिळत आहे. केवळ भाजपमुळेच शहराचे प्रश्‍न सुटल्याचे त्यातून सांगण्याचा प्रयत्न केला जात आहे. यात शिवसेनेला डावलले जात असून, निर्णय युती सरकारचे असले; तरी त्यातून व्यक्तिगत श्रेय घेण्याचा हा प्रकार आहे.

विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असून, येत्या आठ ते दहा दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी इच्छुकांची जोरदार तयारी सुरू असून, उमेदवारी मिळण्यासाठी धडपड सुरू आहे. शहरातील सत्ताधारी आमदारही पुन्हा इच्छुक असून, त्यांनी शहरभर फ्लेक्‍सबाजीचा धडाका लावला आहे. सरकारने शहराबाबत घेतलेल्या निर्णयांचा आधार घेत यासाठी आपणच पाठपुरावा केल्याचे फ्लेक्‍सवर ठळक अक्षरात नमूद केले आहे. मात्र, युती सरकारमधील भाजपला आपल्यासोबत शिवसेनादेखील असल्याचा विसर पडलेला दिसत आहे. अमुक एका प्रश्‍नासाठी राज्य सरकारने मंजुरी दिल्याने शहरातील नागरिकांचा प्रश्‍न सुटला आहे, असे नमूद असले; तरी या सरकारमधील शिवसेनेला यात डावलल्याचे दिसून येत आहे. मोठ्या फ्लेक्‍सवर केवळ भाजपच्याच पदाधिकाऱ्यांची छबी झळकत आहे. यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. भोसरी व चिंचवड विधानसभा मतदारसंघांत फ्लेक्‍सची संख्या जास्त आहे.

डिझाइनवर भर
फ्लेक्‍स बनविताना आकर्षक डिझाइन करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात असून डिझाइन, त्यातील मजकूर, यावर अधिक काम केले जात आहे. ते आकर्षक कसे वाटेल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: last five years the state government made some decisions related to the city of PCMC