हुतात्मा सौरभ फराटे यांच्यावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 डिसेंबर 2016

फुरसुंगी (पुणे) - जम्मू- काश्‍मीरमधील पाम्पोर येथे दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर शनिवारी (ता. 17) केलेल्या हल्ल्यात हुतात्मा झालेले गंगानगर (फुरसुंगी) येथील लान्सनायक सौरभ नंदकिशोर फराटे (वय 32) यांच्यावर आज (सोमवार) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

आठ दिवसांपूर्वीच सुटी संपवून जम्मू- काश्‍मीरला कर्तव्यावर हजर झालेल्या सौरभ यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. रविवारी रात्री सौरभ यांचे पार्थिव घरी आणण्यात आले. आज सोमवारी सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सौरभ फराटे हे रायफल रेजिमेंटमध्ये होते. त्यांचा धाकटा भाऊ रोहित हाही जम्मू-काश्‍मीरमध्ये लष्करात आहे.

मूळचे लोणीकंद येथील सौरभ हे 2004 मध्ये लष्करात भरती झाले होते. त्यानंतर 2009 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. सौरभ यांना सेवेतून निवृत्त होण्यास चार वर्षे शिल्लक होती. सौरभ यांच्या लग्नाचा वाढदिवस 28 ऑक्‍टोबरला व 24 नोव्हेंबरला त्यांच्या जुळ्या मुली आराध्या व आरोही यांचा वाढदिवस असल्याने सौरभ हे सुटीवर आले होते. कर्तव्यावर हजर होण्यासाठी नऊ डिसेंबरला ते जम्मू- काश्‍मीरला रवाना झाले होते. केवळ दहा दिवसांपूर्वीच घरून सर्वांना भेटून गेलेल्या सौरभ यांच्या मत्यूची बातमी शनिवारी घरी पोचताच त्यांची पत्नी सोनाली, आई मंगल, वडील नंदकिशोर यांना मोठा धक्का बसला.

Web Title: Last rites ceremony of gunner Saurabh Farate, who lost his life in Pampore Attack