‘लाट’ येणार की फुगा फुटणार?

सुनील माळी
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची आलेली लाट महापालिकेच्या निवडणुकीतही टिकेल का... म्हणजेच दुसऱ्या शब्दांत पुणेकर मतदाराने लोकसभा- विधानसभेसाठी उमेदवार न पाहता केवळ मोदींच्या प्रतिमेलाच मते दिली, तशीच ते स्थानिक महापालिकेच्या निवडणुकीतही देतील का... या प्रश्‍नाच्या उत्तरावरच पुण्याच्या महापालिकेची सूत्रे कोणाकडे जाणार ते ठरणार आहे. 

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची आलेली लाट महापालिकेच्या निवडणुकीतही टिकेल का... म्हणजेच दुसऱ्या शब्दांत पुणेकर मतदाराने लोकसभा- विधानसभेसाठी उमेदवार न पाहता केवळ मोदींच्या प्रतिमेलाच मते दिली, तशीच ते स्थानिक महापालिकेच्या निवडणुकीतही देतील का... या प्रश्‍नाच्या उत्तरावरच पुण्याच्या महापालिकेची सूत्रे कोणाकडे जाणार ते ठरणार आहे. 

या प्रश्‍नाचे उत्तर होकारार्थी आले तर भाजपच्या अगदी नवख्या, काल-परवा पक्षात आलेल्या उमेदवाराकडूनही राष्ट्रवादी किंवा काँग्रेसच्या नावाजलेल्या उमेदवाराचा सहजी- आश्‍चर्यकारकरीत्या पराभव होईल, भाजप शिवसेनेच्या मदतीने सत्तेवर बसेल आणि ते उत्तर नकारार्थी असेल, तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळाने सत्ता टिकविण्याकरिता लागणाऱ्या संख्येच्या किमान आसपास पोचलेली असेल.

महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचे खरे रणशिंग फुंकले गेले ते ८ फेब्रुवारीला झालेल्या उमेदवारांच्या चिन्हवाटपानंतर. त्यानंतरच्या उण्यापुऱ्या अकरा दिवसांत शहराच्या विविध भागांतील राजकीय स्थितीची प्रत्यक्ष फिरून निष्पक्ष पाहणी केली असता काही निष्कर्ष समोर आले. 

लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत देशाप्रमाणेच पुण्यातही दिसली ती नरेंद्र मोदी यांच्या नावाची लाट. या लाटेने राजकीय पंडितांचे आडाखे पार धुळीला मिळविले. पुण्याच्या काँग्रेसचे कॅंटोन्मेंट, शिवाजीनगरसारखे बालेकिल्ले या लाटेने कुठच्या कुठे वाहून गेले. दिल्ली आणि मुंबईत भाजपचे सरकार आले आणि आता दिल्लीप्रमाणेच गल्लीतही, म्हणजेच महापालिकेतही भाजपलाच निवडून द्या, असे साकडे लोकांना घालण्यात आले आहे. पुणेकर मतदार नेमके काय करेल? तो पुन्हा नमो नमः म्हणत भाजपला एकतर्फी विजय मिळवून देईल, का स्थानिक पातळीवर वेगळा विचार करेल, याचीच उत्सुकता आता आहे. मतदाराला गृहीत धरून आडाखे बांधले तर तोंड पोळून घ्यायची वेळ येते, हे यापूर्वीच्या अनुभवावरून दिसून आले आहे. पहिली शक्‍यता प्रत्यक्षात उतरली तर भाजप पुढे जाईल आणि शिवसेनेच्या मदतीने सत्ता हस्तगत करेल. मात्र, मतदारांनी लोकसभा- विधानसभेच्या मतदानाची री स्थानिक निवडणुकीत ओढण्याचे नाकारले तर पारंपरिक मतदारांचे प्रमाण, उभ्या असलेल्या उमेदवारांचे प्रभावी आणि कमकुवतपण, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कारभाराचा बरावाईट परिणाम यांवर निकाल अवलंबून असेल. 

या निवडणुकीतील प्रमुख पक्षांमधील खडाखडी सुरू झाली ती काही गोष्टी गृहीत धरूनच. भाजप हा सत्तेच्या अगदी जवळ आलेला आहे, अशी समजूत मुळात भाजपवासीयांची झाली. परिणामी वातावरण पहिल्या टप्प्यात भाजपला पोषक असे झाले. त्यानंतर उमेदवारी निश्‍चितीच्या टप्प्यात मात्र भाजपने अकारण चुकीच्या खेळी केल्या. बाहेरून आलेल्या ३९ जणांना त्या पक्षाने उमेदवारी दिली. ती टक्केवारी जरी आठ- दहा टक्के एवढीच असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला असला, तरी प्रत्यक्षात ती वीस ते बावीस टक्‍क्‍यांवर गेली आहे. त्यातही पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांना देण्यात आलेली उमेदवारी, हा मुद्दाही पक्षप्रतिमेला डागाळणारा ठरला. त्याचा विपरीत परिणाम केवळ या पार्श्‍वभूमीचे उमेदवार दिलेल्या प्रभागांत नव्हे, तर शहरातील इतर प्रभागांतही झाला.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र उमेदवारीनिश्‍चितीची फेरी काँग्रेसच्या मदतीने जिंकल्याचेच दिसून आले. भाजपच सत्तेवर येण्याची शक्‍यता व्यक्त होऊ लागल्याने हबकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीनिश्‍चितीच्या टप्प्यात खूपच कौशल्य वापरल्याचे दिसून आले. पहिले म्हणजे त्या पक्षाने काँग्रेसशी आघाडी करून निश्‍चित निवडून येणाऱ्या जागांवरील काँग्रेस- राष्ट्रवादीला मानणाऱ्या मतांमधील विभागणी टाळण्याचा प्रयत्न केला आणि तो बऱ्याच अंशी यशस्वी ठरला. दोन्ही पक्षांच्या विद्यमान जागा टिकून राहण्यासाठी त्याचा उपयोग निश्‍चितपणे होणे शक्‍य आहे. काँग्रेसला आघाडीत तीसच जागा मिळाल्या असल्या तरी विद्यमान जागांवर विजयाची शक्‍यता आणि मैत्रीपूर्ण लढतीमध्ये भरपूर जागांवर नशीब आजमावण्याची संधी या दोन बाबी त्या पक्षाच्या पथ्यावर पडल्या. त्यामुळे आघाडी ही दोन्ही पक्षांच्या दृष्टीने शहाणपणाची ठरली. 

भाजपला पोषक वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रचार सुरू झाल्याने प्रत्येक पक्षाच्या प्रचारात भाजप हाच केंद्रस्थानी राहिला. राष्ट्रवादी, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना यांच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा भाजप हाच राहिला. त्यामुळे त्या पक्षावर टीका झाली तरी नकळत त्या पक्षाचा प्रचारच होत राहिला. प्रचारात अन्य मुद्दे आणून भाजपला अनुल्लेखाने मागे टाकण्याचे भान प्रमुख भाजपेतर पक्षांमध्ये राहिले नाही. याला अपवाद मनसेच्या राज ठाकरे यांनी केलेल्या एकमेव नाशिक पॅटर्नच्या सादरीकरणाचा होता. भाजपने मात्र विकासाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवटीतील कमकुवत मुद्देही मांडले. 

भाजप दिल्ली आणि मुंबईत सत्तेवर असला आणि त्याचा लाभ पुणे महापालिकेत उठवण्यासारखी स्थिती निर्माण होत असली, तरी तो घेण्याइतपत संपूर्ण शहरात सर्वदूर अशी ताकदवान पक्षसंघटना भाजपकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. भाजपची यंत्रणा कोथरूड, कसबा, पर्वती या तीन विधानसभा मतदारसंघांत मजबूत अशी असून, इतर मतदारसंघांत ती कमकुवत आहे. १९९२ च्या निवडणुकीत पक्षाचे २४, त्यानंतर १९९७ च्या निवडणुकीत २०, त्यानंतर २००२ च्या निवडणुकीत ३३ आणि २०१५ च्या निवडणुकीत २६ नगरसेवक निवडून आले. पक्षाला मानणाऱ्या ठराविक भागातूनच हे नगरसेवक बहुसंख्येने निवडले गेले होते. अनेक भागांत या पक्षाला उमेदवारच नव्हे, तर कार्यकर्तेही मिळणे मुश्‍कील होते. आता मात्र स्थिती बदलली असून, बऱ्याच भागांतून पक्षात येणाऱ्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत पक्षाची उडी दुपटीवर जाऊ शकेल आणि त्या पक्षाच्या दृष्टीने ती लक्षणीय आणि अभिनंदनीय वाढ असेल; पण बहुमताचा घास पक्ष या वेळी घेऊ शकेल का, याबाबत साशंकता व्यक्त होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती वेगळी आहे. पुण्याच्या हद्दीत आलेल्या गावांमध्ये राष्ट्रवादीचा पाया पक्का असून त्यासह मूळ पुण्यातही अनेक ठिकाणी पक्षाचे उमेदवार निवडून येतात, हा २००२ पासूनचा अनुभव आहे. निवडणुकीच्या फडात पक्षाने रचलेल्या चाली, त्यांच्या पक्षनेतृत्वाने प्रत्येक प्रभागात वैयक्तिक घातलेले लक्ष आणि शेवटच्या टप्प्यात शरद पवार यांनी पुण्यासाठी दिलेला वेळ यामुळे त्यांच्या मूळच्या जागा टिकण्याची शक्‍यता आहेच; पण त्यात आणखीही काही जागांची भर पडू शकते.    
...अर्थात, मतदारराजा पारंपरिक पद्धतीने आपापल्या पक्षाकडेच राहिला तर आणि तरची ही स्थिती आहे. मतदारांनी पारंपरिकता नाकारून विशिष्ट हेतूने मतदान केले तर पुण्याचा निकाल वेगळाच लागू शकतो आणि २३ फेब्रुवारीच्या दिवसअखेरीस स्पष्ट बहुमत, युती-आघाडी याबरोबरच आश्‍चर्यकारक अशी अपारंपरिक आघाडीही आकाराला येऊ शकते... उत्कंठता त्याचीच आहे.

Web Title: The last wave of the BJP municipal elections