दुःख वाटतेच; त्याहून अधिक अभिमान वाटतो

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - ""तो देशप्रेमी होता... तो देशासाठीच जन्मला अन्‌ देशासाठी सीमेवर लढताना प्राण गमावले... तो आमचा मुलगा होता अन्‌ देशाचाही... त्याची कमतरता जाणवेल; त्याच्या जाण्याचे दुःख वाटतेच; पण त्याहूनही अधिक अभिमान वाटतो,'' असे मुन्नागीर गोसावी सांगत होते.

पुणे - ""तो देशप्रेमी होता... तो देशासाठीच जन्मला अन्‌ देशासाठी सीमेवर लढताना प्राण गमावले... तो आमचा मुलगा होता अन्‌ देशाचाही... त्याची कमतरता जाणवेल; त्याच्या जाण्याचे दुःख वाटतेच; पण त्याहूनही अधिक अभिमान वाटतो,'' असे मुन्नागीर गोसावी सांगत होते.

भारतीय सैन्य दलातील दिवंगत मेजर कुणाल गोसावी यांचे ते वडील. ऐन तारुण्यात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या कुणालबद्दल ते भरभरून बोलत होते. त्यांच्याविषयी मनात दडलेल्या आठवणींना ते गुंफत होते. मुलगा गेल्याचे दुःख मांडण्यापेक्षा त्याच्या पराक्रमाचा जिवंतानुभव ते त्यांच्या शब्दांतून मांडत होते. त्यांचे डोळे नकळत पाणावत होते; पण मुलाची शौर्यकथा सांगताना फुलून आलेल्या अभिमानाने आणि देशभक्तीने डोळ्यांतील पाणी मागेही सरत होते.

जम्मू-काश्‍मीरमधील नागरोटा सांबा सेक्‍टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पंढरपूरचे मेजर कुणाल मुन्नागीर गोसावी यांना वीरमरण आले. त्यांच्या याच पराक्रमाचा अभिमान कुणाल यांच्या आई-वडिलांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केला. संपादकीय विभागाशी संवाद साधताना कुणालच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंना स्पर्श करत त्यांच्या आठवणीलाही त्यांनी शब्दरूप दिले.

मुलाच्या पराक्रमाविषयी बोलताना मुन्नागीर म्हणाले, ""कुणाल हा देशप्रेमी होता. तो देशाचा सुपुत्र होता. त्याच्या पराक्रमाने आमचे नाव उंचावले आहेच. पण, अन्य तरुणांनीही सैन्यदलात येऊन देशासाठी योगदान द्यावे. प्रत्येक गावातील तीनशेहून अधिक तरुणांनी लष्करात भरती व्हावे. त्यामुळे देशाची सीमा सुरक्षित राहू शकेल.''
मेजर कुणाल यांच्या आई वृंदा म्हणाल्या, ""कुणाल लहानपणापासून हुशार होता. त्याला सैन्यदलाचे आकर्षण होते. मी देशासाठी लढणार असे तो सारखं म्हणत होता आणि त्यांनी ते करून दाखवले. कुणालच्या मनात देशासाठी खूप काम करायचे होते, ते राहून गेले. त्यामुळे आम्हाला असे वाटते, की अधिकाधिक तरुणांनी सैन्यात भरती व्हावे; तसेच प्रत्येक गावातील मुलांमध्ये लहानपणापासूनच असे संस्कार रुजविले पाहिजेत.''

तरुणांना प्रेरणा मिळेल, असे उपक्रम राबविण्यासाठी कुणालच्या नावाने सामाजिक संस्था किंवा तरुणांनी सैन्यदलात जावे, यासंदर्भात प्रशिक्षण देणारी केंद्रे स्थापन करण्यात यावीत, त्यामुळे आजच्या तरुणांना प्रोत्साहन मिळेल. तसेच सैन्यात अधिकाधिक तरुण सहभागी होतील आणि देशाच्या सुरक्षेसाठी जवान उभे राहतील.
- मुन्नागीर गोसावी, मेजर कुणालचे वडील

नातही म्हणते सैन्यात जायचंय
मेजर कुणालच्या आई वृंदा म्हणाल्या, ""मेजर कुणालची मुलगी पाच वर्षांची असून, तिनेही सैन्यदलात जाण्याची इच्छा बोलून दाखवत आहे. तिला सैन्यात भरती होण्यासाठी आम्हीही प्रोत्साहित करत आहोत. कुणालची पत्नी स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय करणार असून, त्यासाठी सरकार मदत करेल, अशी आशा वाटते.''

Web Title: late Major Kunal gosavi father feeling