कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान पेलणार - रश्‍मी शुक्‍ला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - शहरात गेल्या वर्षभरात खून, खुनाचा प्रयत्न, सायबर, फसवणूक आणि बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ झाली, तर दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. शहर पोलिसांची गतवर्षातील कामगिरी समाधानकारक राहिली आहे. नव्या वर्षात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असून, पोलिस कोठेही कमी पडणार नाहीत, अशी ग्वाही पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिली. आगामी महापालिका निवडणूक भयमुक्‍त वातावरणात पार पडेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. 

पुणे - शहरात गेल्या वर्षभरात खून, खुनाचा प्रयत्न, सायबर, फसवणूक आणि बलात्काराच्या गुन्ह्यात वाढ झाली, तर दरोडा, जबरी चोरी, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. शहर पोलिसांची गतवर्षातील कामगिरी समाधानकारक राहिली आहे. नव्या वर्षात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान असून, पोलिस कोठेही कमी पडणार नाहीत, अशी ग्वाही पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिली. आगामी महापालिका निवडणूक भयमुक्‍त वातावरणात पार पडेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. 

पोलिस आयुक्तालयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत शुक्‍ला बोलत होत्या. या वेळी त्यांनी 2016 मधील शहरातील गुन्ह्यांबाबत विस्तृत माहिती दिली. सह आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्‍त आयुक्‍त शशिकांत शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

गेल्या वर्षात 130 जणांचा खून आणि 191 व्यक्‍तींच्या खुनाचा प्रयत्न झाल्याचे गुन्हे दाखल झाले. दिवसा 359 आणि रात्रीच्या 775 ठिकाणी घरफोड्या झाल्या. वर्षभरात सोनसाखळी चोरीच्या 143 घटना घडल्या. त्यापैकी 109 गुन्ह्यांची उकल झाली. गतवर्षीच्या तुलनेत या गुन्ह्यांत 57 टक्‍क्‍यांनी घट झाली असून, 37 चोरट्यांना अटक केली आहे. सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण 77 टक्‍के आहे. 

वाहनचोरी करणाऱ्या 18 टोळ्यांतील 65 आरोपींना अटक केली. जबरी चोरी, दरोड्याच्या गुन्ह्यात टोळ्यांमधील तसेच सराईत गुन्हेगारांना अटक केली. एमपीडीए कायद्यांतर्गत 25 गुन्हेगार आणि 10 टोळ्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत कारवाई केली. गेल्या वर्षात ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्पलाइन, ऑनलाइन पासपोर्ट पोलिस पडताळणी, महिला बीट मार्शल, वाहतूक, सायबर आणि अमली पदार्थ पथकाच्या वतीने जनजागृती मोहीम राबविण्यात आली. 

महिलांवरील अत्याचारात वाढ 
नवविवाहित महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. महिलांवरील बलात्कारप्रकरणी 354 आणि विनयभंगाचे 661 गुन्हे दाखल झाले. पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. बलात्काराच्या घटनांमध्ये आरोपी हे 13 टक्‍के नातेवाईक, 68 टक्‍के ओळखीचे, 16 टक्‍के शेजारी आणि अन्य अनोळखी व्यक्‍ती होते. एकूण घटनांपैकी लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचे प्रमाण निम्मे असल्याचे आयुक्‍त शुक्‍ला यांनी सांगितले. 

- महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य 
- सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई सुरूच राहील 
- वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न 
- प्रत्येक पोलिस ठाण्यात सायबर पोलिस कर्मचारी 
- सर्व पोलिस ठाणी स्मार्ट करणार 
- रस्त्यांवरील गुन्हेगारी कमी करणार 

26 बिल्डरांविरुद्ध मोफा 
शहरातील 26 बांधकाम व्यावसायिकांविरुद्ध "मोफा' कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. बालेवाडी येथील प्राइड पर्पल इमारतीचा स्लॅब कोसळून नऊ मजुरांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सहा फरारी बांधकाम व्यावसायिकांना अटकपूर्व जामीन मिळू नये, यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. आरोपी कितीही मोठा असाल तरीही त्याला अटक करण्यात येईल, अशी ग्वाही शुक्‍ला यांनी दिली. 

सायबर गुन्ह्यांत वाढ 
सायबर गुन्ह्यांत 93 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षांत दोन हजार 79 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 312 गुन्हे दाखल केले. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी आर्म ऍक्‍टनुसार 113 गुन्ह्यांत 150 गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून 159 पिस्तूल आणि 402 काडतुसे जप्त केली. तसेच अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी 63 गुन्ह्यांत 81 आरोपींना अटक केली असून, सव्वादोन कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. 

Web Title: Law and order challenge to cope - rashmi shukla