हिंमत असेल तर आंदोलन कराच - आमदार लक्ष्मण जगताप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

पिंपरी - अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न अचानक निर्माण झालेला नाही. पंधरा वर्षांहून अधिक काळ राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा त्यांना प्रश्‍न सोडवावा असे वाटले नाही, आता भाजपच्या हाती सत्ता आल्यावर अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या लोकांनी आंदोलनाची भाषा सुरू केली आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आंदोलन करून दाखवावे, असे आव्हान भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले.

पिंपरी - अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न अचानक निर्माण झालेला नाही. पंधरा वर्षांहून अधिक काळ राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. तेव्हा त्यांना प्रश्‍न सोडवावा असे वाटले नाही, आता भाजपच्या हाती सत्ता आल्यावर अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या लोकांनी आंदोलनाची भाषा सुरू केली आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आंदोलन करून दाखवावे, असे आव्हान भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसला दिले.

येत्या बुधवार व गुरुवारी (ता. २६ व २७) भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात होत आहे. त्यासाठी पक्षाच्या वतीने जय्यत तयारी सरू असून, सोमवारी दुपारी प्रेक्षागृहातील तयारीची पाहणी आमदार जगताप यांनी केली, त्या वेळी ते ‘सकाळ’शी बोलत होते. प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाचे सरकारमधील सर्व मंत्री तसेच खासदार, आमदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. हे निमित्त साधून शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती भापकर तसेच राष्ट्रवादी काँग्रेसह सर्वपक्षीयांनी अनधिकृत बांधकाम, शास्तीकर माफी या मुद्यांवर आंदोलनाचा इशारा दिला आहे. या संदर्भात विचारणा केली असता आमदार जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आंदोलनाचा नैतिक अधिकार नाही, हिंमत असेल तर त्यांनी आंदोलन करून दाखवावे, असे खुले आव्हान राष्ट्रवादीला दिले.

जगताप म्हणाले, ‘‘मारुती भापकर यांच्यासारख्या व्यक्तीने आंदोलने केले तर ते समजू शकतो, पण ज्यांच्यामुळे अनधिकृत बांधकामाचा व शास्तीकराचा प्रश्‍न निर्माण झाला, पंधरा वर्षांत या प्रश्‍नाचे त्यांनी राजकीय भांडवल केले, त्यांना आंदोलनाचा नैतिक अधिकारच नाही. त्यांची प्रश्‍न सोडविण्याची तयारी नव्हती. भाजपचे सरकार सत्तेवर येताच हा प्रश्‍न सोडविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. हा बेसिक फरक त्यांच्यात आणि आमच्या सरकारमध्ये आहे. राष्ट्रवादीचा आंदोलनाचा इशारा त्यांच्या अर्धवट ज्ञानावर आधारलेला आहे. सरकारने, हा प्रश्‍न सोडविण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात म्हणणे मांडले होते, ते न्यायालयाने फेटाळले एवढेच त्यांना माहीत आहे. त्याचाच अपप्रचार राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पण, न्यायालयाने सरकारची बाजू फेटाळल्यानंतर लगेचच सरकारने त्यासंबंधीचा कायद्याला मंजुरी देऊन प्रश्‍न निकाली काढला.’’ 

शास्तीकराच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे ठरावीक दहा टक्के लोकांनाच त्याचा फायदा होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यावर बोलताना जगताप म्हणाले, ‘‘गोरगरिबांना या निर्णयाचा लाभ व्हावा, हा त्यामागील हेतू आहे. गरीब लोक कायद्याने अज्ञान असताना गरज म्हणून घरे बांधतात तर मोठे लोक कायद्याची माहिती असूनही चुकीची बांधकामे करतात. त्यांना याचा लाभ व्हावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटते का?’’

भाजपला सत्तेची मस्ती - वाघेरे
आमदारांनी जरी दम दिला तरी लोकशाही मार्गाने आंदोलन करणे हा घटनेने दिलेला अधिकार आहे. त्यानुसार आम्ही आंदोलन करणार आहोत. मात्र, भाजपला सत्तेची मस्ती आल्यामुळेच ते आंदोलन करून दाखवा, अशी चिथावणीची भाषा करीत आहेत. आम्ही रीतसर परवानगी मागणार आहोत. मात्र, पोलिसांनी परवानगी दिली अथवा नाकारली तरी आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करणारच आहोत. त्यांनी गुंड आणोत अथवा पोलिसी बळाचा वापर करो. आम्ही होणाऱ्या परिणामांना तयार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले.

आंदोलनाशी शिवसेनेचा संबंध नाही
अनधिकृत बांधकाम, शास्तीकर आणि महापालिकेच्या कारभाराविरोधात शिवसेनेचे मारुती भापकर हे भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीच्या वेळी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. हे आंदोलन सर्वपक्षीय म्हटले जात असले तरी शिवसेनेचा त्याला पाठिंबा नाही. आंदोलन हा भापकर यांचा वैयक्तिक प्रश्‍न असल्याचे शिवसेना शहर प्रमुख राहुल कलाटे यांनी सांगितले.

Web Title: laxman jagtap warning to ncp