लक्ष्मीबाई पाटील आपल्या कार्यातून अजरामर - डॉ. अरविंद बुरूंगले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बुरूंगले बोलत होते.

हडपसर - कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण शिक्षण संस्थेतील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांच्या भोजन खर्चासाठी गळ्यातील मणिमंगळसूत्राचा त्याग करणाऱ्या रयत माउली लक्ष्मीबाई पाटील आपल्या कार्यातून अजरामर झाल्या. त्यांचा आदर्श समाजातील सर्व घटकांनी घेतला तर नवसमाजाची निर्मिती होईल, असे मत प्राचार्य डॉ. अरविंद बुरूंगले यांनी व्यक्त केले. 

रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बुरूंगले बोलत होते. याप्रसंगी डॉ. वैशाली पाटील, डॉ. अशोक धामणे, डॉ. दत्तात्रय हिंगणे, प्रा, संगीता यादव, डॉ. सुनंदा पिसाळ, डॉ. बेबी खिलारे, डॉ. सरोज पांढरबळे. प्रा. जी. के. घोडके, अधीक्षक आर. आर. जाधव उपस्थित होते.

डॉ. बुरूंगले पुढे म्हणाले, बाई पाटील यांनी निस्सीम त्याग केल्यामुळेच रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली. तळागाळातील व बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची दारे खुली झाली. लक्ष्मीबाईंच्या त्यागमय कार्यामुळेच रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा वटवृक्षासारखा विस्तार झाला. लक्ष्मीबाई यांनी रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून तर विकासपर्यंत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबरोबर स्वतःचे आयुष्य खर्ची घातले. रयत शिक्षण संस्थेतील मुले हि हेच माझे दागिने आहेत, असे समजून सुखाकडे दुर्लक्ष करून रयतेच्या विकासाकडे त्यांनी लक्ष दिले.

Web Title: laxmibai bhaorao patil death anniversary program dr arvind burungale