लक्ष्मीनगर हागणदारीमुक्त कधी होणार

जितेंद्र मैड
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

काय करता येईल

  • तातडीने स्वच्छतागृह दुरुस्त करणे
  • स्वच्छतागृहावर केअरटेकर नेमणे
  • स्वच्छतागृहात दिवे लावणे
  • पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे
  • पोलिसांनी गस्त घालणे
  • कचरा संकलनाची शिस्तबद्ध व्यवस्था असणे

पौडरस्ता - हागणदारीमुक्तची चर्चा सगळीकडे असली तरी कोथरूडमधील लक्ष्मीनगर मात्र अद्यापही त्यापासून दूरच आहे. पुरेशा स्वच्छतागृहांअभावी महिलांची कुचंबना होत असून, त्यांना नाईलाजाने बाहेर जावे लागते. आरोग्य निरीक्षक व मोकादम यांनी स्वच्छतागृहांची पहाणी करून त्याचा अहवाल अधिकाऱ्यांना दिला आहे; परंतु अद्यापही त्यावर कार्यवाही झालेली दिसत नाही.

लक्ष्मीनगरमध्ये महिलांसाठी ३५, पुरुषांसाठी ३४ सीट असे एकूण ६९ सीट उपलब्ध आहेत. पैकी सुमारे ५० सीट वापरता येतात. एक हजार लोकसंख्येसाठी एक सीट उपलब्ध होते. त्यामुळे बहुतांशी लोकांना बाहेर जावे लागते. वाघजाई माता मंदिरासमोरील जुन्या स्वच्छतागृहाशेजारील १० सीटचे बेबी चॅनल गेल्या दोन वर्षांपासून नादुरुस्त आहे. तसेच अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक भवन पाठीमागील स्वच्छतागृहामधील एकूण ०५ सीटचे बेबी चॅनल पण बंद आहे. 

लक्ष्मीनगरमध्ये ८ सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. फक्त केअरटेकर असलेल्या स्वच्छतागृहांव्यतिरिक्त इतरांची दुरवस्था झालेली आहे. २०१७ मध्ये आमदार निधीतून येथे स्वच्छतागृह उभारण्यात आले; परंतु त्याचे दरवाजे तुटलेले असून, ते तुंबलेले आहे. स्वच्छतागृहांची तातडीने दुरुस्ती करावी व ते खुले करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. गल्ली नंबर ६ व ९ च्या मध्ये असलेल्या बंद स्वच्छतागृहात बांधकामाचा राडारोडा टाकलेला आहे. सखुबाई चव्हाण, मनीषा चव्हाण, नीला राठोड, सुनिता राठोड, सोना चव्हाण, मंजुला चव्हाण, वैशाली धोत्रे या महिलांनी सांगितले, की स्वच्छतागृह नसल्याने आम्हाला फार त्रास सहन करावा लागतो. येथे व्यवस्थित पाणीही येत नाही. डास, अस्वच्छतेमुळे आमचे हाल होत आहेत. यासंदर्भात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता नाव न सांगण्याच्या अटीवर त्याने सांगितले, की दोन स्वच्छतागृहांमधील स्वच्छता केअरटेकर करतात. बाकीच्या स्वच्छतागृहांमधील स्वच्छता महापालिका कर्मचारी करतात. स्वच्छतागृह साफसफाई करणारे मेहतर सेवक एकच असल्याने ते रजेवर गेले तर पर्यायी सेवक उपलब्ध नाही.

मद्यपींकडून तोडफोडीचे प्रकार
झोपडपट्टीतील स्वच्छतागृह कसे वापरावे याविषयी अनेक वेळा प्रबोधन केले तरीसुद्धा काही लोक दारू पिऊन बाटल्या आत टाकणे, तसेच दारे, खिडक्‍या, विजेची जोडणी  तोडणे, नळाच्या तोट्या चोरून नेतात. शौचालयावरील पाण्याच्या टाक्‍या फोडणे असे प्रकार वारंवार घडतात.

आम्हाला लहान मुलींना स्वच्छतागृहाकडे न्यायचे झाले तर त्यासाठी एक तास द्यावा लागतो. तेथे वीज नाही. उघड्या टाकीत एखादी महिला पडली तर ती दिसायची पण नाही. स्वच्छतागृहाची व्यवस्था करा आणि लक्ष्मीनगर पहिले हागणदारीमुक्त करा.
- गीता धोत्रे, रहिवासी  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Laxminagar Hagandarifree