दोन्ही काँग्रेसची आघाडी अपरिहार्य

दोन्ही काँग्रेसची आघाडी अपरिहार्य

पुणे - राज्याचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी आम्ही आणि चव्हाण यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केले पाहिजे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी निवडणुकीसाठी दोन्ही काँग्रेसची आघाडी अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले; तसेच पक्षापेक्षा कर्तृत्ववान व्यक्तींना सहकार्य केले जाईल, असेही सांगितले.

महापालिकेने उभारलेल्या (कै.) सदू शिंदे मैदानाचे उद्‌घाटन पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पवार बोलत होते. या वेळी माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार डॉ. विश्‍वजित कदम, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार उल्हास पवार, रमेश बागवे, मोहन जोशी, नगरसेवक आबा बागूल उपस्थित होते. 

पवार म्हणाले, ‘‘पुणे शहर हे क्रिकेटसाठी एकेकाळी मार्गदर्शक होते. पुणेकरांनी अनेक राष्ट्रीय खेळाडू दिले. सदू शिंदे हे फिरकी गोलंदाज होते. त्यांच्यासारखी गोलंदाजी करण्याची चंदू बोर्डे यांची इच्छा होती, असे बोर्डे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे. मात्र, बोर्डे हे चांगले फलंदाज झाले.’’ बीसीसीआय आणि आयसीसी या दोन्ही संघटनांवर काम करतानाचे अनुभव त्यांनी या वेळी सांगितले. क्रिकेटसाठी पायाभूत सुविधा करता आल्या. सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्या सल्ल्यानेच धोनीकडे कर्णधारपदाची सूत्रे सोपविल्याचा किस्सा त्यांनी सांगितला.

जावई असल्याचा असाही फायदा
आपल्या भाषणात पवार यांनी सदू शिंदे यांच्याबाबत काही आठवणी सांगितल्या. ‘‘शिंदे यांना मैदानावर गोलंदाजी करताना प्रत्यक्ष पाहिले नाही. मात्र, व्यक्तिगत जीवनात मी त्यांचा ‘विकेट’ ठरलो, असे पवार यांनी मिस्कीलपणे सांगितले. बारामती मतदारसंघातील चौधरवाडी येथील एक गृहस्थ तर सदू शिंदे यांचा जावई असल्यानेच मला आवर्जून मतदान करायचे, अशी आठवणही त्यांनी सांगितली. तेव्हाच, चौधरवाडीचे इथे कोणी आहे का, असे विचारताना ते म्हणाले, ‘‘यापुढेही मतदान करणार ना? मात्र मला नाही. मी निवडणुकीत उभा राहणार नाही. त्यामुळे ताई म्हणजे, सुप्रिया सुळे यांना मतदान करा.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com