महापालिकेच्या नव्या इमारतीत अजूनही गळती सुरूच 

Untitled-4.jpg
Untitled-4.jpg

पुणे : महापालिकेच्या नव्या इमारतीतील पाण्याची गळती अजूही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे सोमवारी पुन्हा दिसून आले. पावसामुळे इमारतीच्या तळमजल्यात पाणी साचले, तर इमारतीच्या एका भिंतीतून पाणी पाझरत असल्याचेही आढळून आले. त्यामुळे या इमारतीचे काम अपूर्ण असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पावसाचा जोर वाढल्याने सर्वत्रच पाणी साचले. त्यामुळे तळमजल्यात पाणी आल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले. 

या इमारतीचे उद्‌घाटन गेल्या महिन्यात उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या कार्यक्रमातच इमारतीच्या छतातून पाण्याची गळती झाली. त्यामुळे काम अर्धवट असतानाच उद्‌घाटन केल्याचा आरोप झाला. त्यानंतर मात्र, संबंधित ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस दिल्याचे सांगत, कामे पूर्ण केली जातील, असे महापालिकेच्या भवनरचना विभागाने स्पष्ट केले; परंतु गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोमवारी दुपारी इमारतीच्या तळमजल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाणी काढले. इमारतीचे उद्‌घाटन होऊन एवढे दिवस झाली तरी, तिचे काम संपलेले नाही. जी कामे झाली तीही निकृष्ट दर्जाची झाल्याचा आरोप महापालिकेतील विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी केला. 

शहरात पावसामुळे काही भागांमधील लोकवस्त्यांमध्ये पाणी शिरण्याच्या घटना घडतात. या पार्श्‍वभूमीवर खडकवासल्यातून पाणी सोडल्यानंतर पुढील भागात खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येणार आहेत, असे महापालिका प्रशासनाने कळविले. मात्र, या परिसरातील नागरिकांनीही काळजी घ्यावी, असे आवाहनही केले आहे. पुलाची वाडी (डेक्कन), खिलारे पाटीलनगर, अंबिल ओढा, शिवणे (नदीकाठ), सिंहगड रस्त्यावरील नदीकाठचा परिसर, कात्रज तलाव परिसर, बोपोडी येथील हॅरिस पुलाजवळील झोपडपट्टी, औंध जुना पूल, बाणेर आणि पाषाण येथील भाग, पाटील इस्टेट, कामगार पुतळा झोपडपट्‌टी, फुलेनगर या भागातील पाणी शिरण्याची शक्‍यता आहे, असे महापालिकेने म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com