परदेशी जाणाऱ्यांना स्वयंपाकाचे धडे

Cooking-Training
Cooking-Training

पुणे - शिक्षण अथवा नोकरीसाठी परदेशात जायचं म्हटलं की पासपोर्ट, व्हिसा, एअर तिकीट बुक करणे, सामानाचे पॅकिंग, अशी भली मोठी यादी असते. पण आता या यादीत भर पडली आहे ती स्वयंपाक शिकण्याची. होय, परदेशात जाणारे आणि विशेषत: मुले स्वयंपाक शिकण्यासाठी ‘किचन’मध्ये डोकावत आहेत.

परदेशात जाण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव करणे हे ओघाने येते. कोणत्याही देशात गेले तरी घरच्यासारखे जेवण अभावानेच मिळते. परिणामी, अनेकांना त्या त्या देशात मिळणारे भारतीय जेवण अथवा तेथील स्थानिक जेवण खावे लागते. सकस जेवण मिळाले नसल्याने आरोग्यावर परिणाम होत असल्याची तक्रार काही जण करतात. म्हणूनच आता परदेशात जाण्यापूर्वी ‘स्वयंपाक शिकण्याचा’ ट्रेंड वाढू लागला आहे.

एरवी घरात कधीतरी चहा, पोहे, भेळ बनविणारा वैभव (नाव बदललेले आहे) आता दुबईमध्ये जाऊन अगदी घरच्यासारखे जेवण बनवू लागला आहे. ‘’परदेशात गेल्यावर सुरवातीला तेथे मिळणारे जेवण खायचो. कालांतराने ते जेवण खाणे, शक्‍य होईना! मग सुटीसाठी पुन्हा घरी आल्यावर खाद्यपदार्थ बनविणे शिकून घेतले. त्यामुळे आता परदेशात जेवणाची अडचण येत नाही,’’ असा अनुभव त्याने सांगितला. 

परदेशात जाण्यापूर्वी काही जण घरच्या घरी स्वयंपाक बनविणे शिकतात. तर काही जण खासगी शिकवणी वर्गात प्रवेश घेतात. आता तर खासकरून मुलांसाठी विशेष वर्ग घेतले जात आहेत. 

‘‘परदेशात जाणाऱ्यांसाठी विशेष वर्ग सुरू करावा लागला. यामध्ये जवळपास ९० टक्के मुले आहेत. चांगले जेवण बनवायला शिकवा, असा त्यांचा आग्रह असतो. यामध्ये डाळ-भात, भाजी-पोळी यांसह गोड पदार्थ, वेगवेगळे पुलाव, मासांहार याची मागणी अधिक असते,’’ असे प्रशिक्षक पल्लवी शहा 
यांनी सांगितले.

मास्टर्स इन इंटेरियर डिझायनिंगचे शिक्षण घेण्यासाठी इटलीला गेलो होते. तेथे जेवणाचे हाल होऊ नयेत, म्हणून जाण्यापूर्वीच स्वयंपाक बनवायला शिकलो. त्यासाठी खासगी शिकवणी वर्गही लावला होता. त्यामुळे सोप्या पद्धतीने न्याहारी आणि जेवण कसे बनवायचे, त्याशिवाय कमीत कमी सामग्रीमध्ये पौष्टिक आहार कसा बनवायचा हे शिकता आले.
- हितेश चांडक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com