किमान दहा जागा आल्याच पाहिजेत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे - प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे किमान दहा उमेदवार निवडून आले पाहिजेत... विधानसभा निवडणुकीची उमेदवारी निश्‍चित करताना आमदारांच्या कामगिरीचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने शहरातील आमदारांना इशारा दिला आहे.

पुणे - प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून पक्षाचे किमान दहा उमेदवार निवडून आले पाहिजेत... विधानसभा निवडणुकीची उमेदवारी निश्‍चित करताना आमदारांच्या कामगिरीचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाने शहरातील आमदारांना इशारा दिला आहे.

शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपचेच आमदार आहेत. महापालिका निवडणुकीचे उमेदवार निश्‍चित करताना काही मतदारसंघांत आमदारांच्या शिफारशी डावलल्या गेल्यामुळे त्यांच्यात नाराजी आहे. परिणामी, विधानसभा मतदारसंघातील काही उमेदवारांकडे आमदारांचे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी पक्षाकडे आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या ‘सन्मान’ कार्यालयात रात्री अकरा ते पहाटे अडीच वाजेपर्यंत शहरातील सर्व उमेदवारांची बैठक झाली होती. त्यात व्यक्तिशः, गटनिहाय उमेदवारांचे म्हणणे पक्षाने ऐकून घेतले आहे. 

या चर्चेदरम्यान उपस्थित झालेल्या मुद्‌द्‌यांची दखल पक्षाच्या प्रदेश स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. दोन वर्षांनी लोकसभा निवडणुकीपाठोपाठ विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या वेळी महापालिका निवडणुकीत आमदारांनी बजावलेल्या भूमिकेचा लेखाजोखा घेण्यात येणार आहे. उमेदवारांची निवड करताना चर्चा, वाद होऊ शकतात; मात्र पक्षाने उमेदवारांची यादी निश्‍चित केल्यावर आमदारांनी त्यांच्या-त्यांच्या विधानसभा क्षेत्रातील उमेदवार निवडून आणले पाहिजेत, असे पक्षाने त्यांना कळविले आहे. 

महापालिकेत भाजपला एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी ८३ जागांची आवश्‍यकता आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पक्षाचा आमदार असल्यामुळे त्यांनी पुढाकार घेऊन उमेदवार निवडून आणले, तर पक्षाला सत्तेचे उद्दिष्ट गाठता येईल, असा पक्ष संघटनेचा होरा आहे. कोथरूड विधानसभा २०, कसबा मतदारसंघात २०, पर्वतीमध्ये २४, खडकवासल्यात २४, कॅंटोन्मेंटमध्ये १६, शिवाजीनगरमध्ये १२ आणि हडपसरमध्ये २४ जागा आहेत. 

कोथरूड, कसबा, पर्वती पक्षासाठी अनुकूल वाटत असले तरी काही ठिकाणी आव्हान आहे. खडकवासला, हडपसर, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कॅंटोन्मेंट या उपनगरांच्या भागात विरोधी पक्षांचे काही ठिकाणी प्राबल्य आहे. हे लक्षात घेऊन प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान दहा उमेदवार निवडून आले पाहिजे, असे प्रदेश स्तरावरून सांगण्यात आले आहे. पक्षाच्या प्रचार सभांमध्येही वडगाव शेरी, कॅंटोन्मेंट, हडपसरमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले असल्याचे पक्षातील सूत्रांनी निदर्शनास आणले.

आमदारांच्या कामगिरीची दखल घेणार
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले, ‘‘केंद्रात आणि राज्यात मतदारांनी पक्षाला साथ दिली असून, पक्षाला अनुकूलता आहे. आता आमदारांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. पुण्यात भाजपचे आठ आमदार असल्यामुळे भाजपलाच यश मिळेल, असा पक्षाचा विश्‍वास आहे. त्यासाठी आमदारांनी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी स्वतः घ्यावी, अशा स्वरूपाचे निरोप त्यांच्यापर्यंत पोचविण्यात आले आहेत. विधानसभेसाठी उमेदवारी निश्‍चित करताना महापालिका निवडणुकीतील कामगिरीची दखल पक्ष नक्‍कीच घेईल.’’

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी मी घेतली आहे. या मतदारसंघात सुमारे ७५० सोसायट्या असून, झोपडपट्ट्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून भेटीगाठी आणि पदयात्रांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे पक्षाला अनुकूल वातावरण निर्माण होत असून, त्याचे परिवर्तन मतांमध्ये निश्‍चितच होईल.
- विजय काळे, आमदार, शिवाजीनगर

Web Title: at least ten seats