पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील खासगी शाळांमधील 25 टक्के राखीव कोट्यातील 39 हजार 888 जागा रिक्त राहिल्या आहेत. यात पुणे जिल्ह्यातील तीन हजार 264 जागांचा समावेश आहे. या जागांसाठी चौथी सोडत काढण्यासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शालेय शिक्षण विभागाला प्रस्ताव पाठविला आहे.
राखीव जागांसाठी तीन फेऱ्या झालेल्या आहेत. तरीही, अनेक जिल्ह्यांमध्ये रिक्त जागा राहिल्या आहेत. तसेच, अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याने त्यांच्या पालकांकडून पुढील प्रवेश फेरी कधी होणार? याबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांकडे विचारणा केली जात आहे. विशेषत: शहरी भागांमध्ये प्रवेशाची आणखी एक फेरी घेण्याबाबत मागणी वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर संचालनालयाने चौथ्या प्रवेश फेरीसाठी सोडत काढण्यास परवानगी मिळण्याबाबत शिक्षण खात्याकडे प्रस्ताव पाठविला आहे.
प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रेय जगताप म्हणाले, ""शालेय शिक्षण विभागाकडे प्रस्ताव पाठविला आहे. परंतु, परवानगी मिळाल्यानंतरच प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.'' सहसंचालक दिनकर टेमकर यांनी सांगितले की, राज्यात रिक्त जागांची संख्या मोठी दिसत असली, तरी काही जिल्ह्यांत अनेक शाळांमध्ये प्रवेशासाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे तेथे प्रवेशासाठी सोडत काढायची की नाही, याबाबत विचार करावा लागेल. मात्र, ज्या जिल्ह्यांत विद्यार्थ्यांचे अर्ज आहेत आणि जागाही रिक्त आहेत, अशा ठिकाणी सोडत काढण्यासंबंधी सरकारकडे विचारणा केली आहे.
प्रवेशाची स्थिती
राज्य/जिल्हा एकूण जागा प्रवेश रिक्त जागा
महाराष्ट्र 116808 76920 39888
पुणे 16594 13329 3265
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.