हा तर महापालिकेवर दिवसाढवळ्या दरोडा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

पुणे - ‘‘एलईडी योजनेतील गोंधळ पाहता महापालिकेवर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे,’’ अशा शब्दांत टीका करीत ‘संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीबरोबरच यामधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केली.

पुणे - ‘‘एलईडी योजनेतील गोंधळ पाहता महापालिकेवर दिवसाढवळ्या घातलेला दरोडा आहे,’’ अशा शब्दांत टीका करीत ‘संबंधित ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकण्याच्या मागणीबरोबरच यामधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी नगरसेवकांनी गुरुवारी सर्वसाधारण सभेत केली.

एलईडी योजनेतील गोंधळावर ‘कॅग’ व महापालिकेच्या मुख्यलेखा परीक्षकांकडून अनेक गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधण्यात आले आहेत. त्याचे पडसाद आज सर्वसाधारण सभेत उमटले. शहरातील रस्त्यांवर विजेचे खांब उभे आहेत, परंतु त्यावर लावण्यासाठी ‘एलईडी फिटिंग्ज’नाहीत. मात्र, महापालिका ठेकेदार कंपनींवर कोट्यवधी रुपयांची उधळण करीत आहे, अशी टीका या वेळी करण्यात आली. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी या योजनेतील कथित गैरव्यवहारावर बोट ठेवले. मेंगडे यांनी या योजनेबाबतचे कॅग व  पालिकेच्या मुख्यलेखा परीक्षकांचा चौकशी अहवालात नमूद असलेले आक्षेपांवरून जोरदार टीका केली. या योजनेद्वारे पालिकेवर भर दिवसा दरोडा घालण्यात आला असून, संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनीही एलईडी योजनेच्या अंमलबजावणीवर टीका करून योजनेबाबत सातत्याने चर्चा होते आहे, त्याबाबत ठोस निर्णय घेण्याची मागणी त्यांनी केली. तर, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी झोपडपट्ट्यांमध्ये एलईडी फिटिंग्ज्‌ उपलब्ध होत नसल्याची टीका केली. नगरसेवक गोपाळ चिंतल यांनी एलईडीतील गोंधळ पाहता दिव्याखाली मोठ्या प्रमाणात अंधार असून, त्याचा नेमका शोध घेतला पाहिजे, अशी मागणीही या वेळी केली. अविनाश बागवे, बाळा ओसवाल,  प्रशांत जगताप यांनीही टीका केली.

महापौरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांची प्रशासनावर टीका
शहरातील रस्त्यांवरील खड्डे, पीएमपी बसखरेदी, एलईडी, आरोग्य, पाणी, वाहतूक कोंडी, अतिक्रमण आदींसह विविध विषयांवरून विरोधकांच्या सुरात सूर मिळवत महापौर, उपमहापौरांसह सत्ताधारी भाजपने गुरुवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेमध्ये महापालिका प्रशासनाला धारेवर धरत सडकून टीका केली.

सर्वसाधारण सभेला विचारात न घेता महापालिका प्रशासनाकडून परस्पर धोरणात्मक निर्णय घेतले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सदस्यांच्या मनात असलेला हा राग आज शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसह विविध प्रलंबित प्रश्‍नांचा आधार घेत प्रशासनावर सडकून टीका केली.

महापालिकेच्या मुख्य सभेने दिलेले आदेश आणि आखलेली धोरणे पायदळी तुडवत अधिकाऱ्यांकडून मनमानी काम करीत आहेत. ते मस्तवाल झाले असून, त्यांच्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, अशी टीका करीत आयुक्त साहेब तुम्ही हातात आसूड घ्या आणि या अधिकाऱ्यांना वठणीवर आणा. अन्यथा पालिकेत एखादा अनर्थ घडेल, असा इशारा नगरसेवकांनी दिला. 

उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘थकीत वेतन, ड्रेनेज, रस्त्यावरील खड्डे, शाळा, वीज, आरोग्य, पाणी, असे विविध प्रलंबित प्रश्न सोडविणे आवश्‍यक आहे. त्यासाठी प्रभागनिहाय आढावा घेऊन तातडीने कार्यवाही करा.’’

सभागृहनेते श्रीनाथ भिमाले म्हणाले, ‘‘नागरिकांची कामे प्रशासनाकडून करून घेणे लोकप्रतिनिधींचे कामच आहे. आम्ही घरची कामे घेऊन येत नाही.  मात्र, आमच्या पत्राचे उत्तर दिले जात नाही. अधिकारी नगरसेवकांना दाद देत नसतील, तर दाद मागायची कोणाकडे. सभागृहाचा अधिकार सभागृहाला दिलाच पाहिजे. सभागृहाच्या परस्पर प्रस्ताव राज्य सरकारला पाठविला जाऊ नये. लोकप्रशासन आणि प्रशासन मिळून काम केले, तरच शहराचा विकास होणार आहे.’’ 

‘‘गणेशोत्सवापर्यंत शहरातील एलईडी न बसविल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. आपण सर्व मिळून कायदेशीर काम करून शहराचा विकास करू. आयुक्त साहेब तुम्ही स्वतः शहरात फिरून परिस्थितीची पाहणी करा. विकास केला, तर आम्ही डोक्‍यावर घेऊ,’’ असे मत विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे यांच्यासह अविनाश बागवे, पृथ्वीराज सुतार, गोपाळ चिंतल, अमोल बालवडकर, माधुरी सहस्रबुद्धे, योगेश ससाणे आदींची भाषणे झाली.

Web Title: LED Scheme Confusion Municipal