अधिकृत चारचाकी पार्किंगकडे पाठ!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

जंगली महाराज रस्त्यावरील स्थिती; महापालिकेकडून पुरेशी व्यवस्था

पुणे - जंगली महाराज रस्त्यावर येणाऱ्या वाहनांसाठी अधिकृत पार्किंग व्यवस्था पुरेशी असली, तरीही रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याचे दिसून येत आहे. अपुरी पार्किंग व्यवस्था असल्याची टीका करणारे वाहनचालक अधिकृत पार्किंगकडे पाठ फिरवत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले. या रस्त्यावर बुधवारी सायंकाळी ६२ वाहने उभी होती, तर याचवेळी येथील ‘मॅकेनाइज्ड पार्किंग’मध्ये जेतमेत १२ ते १५ मोटारीच उभ्या होत्या. येथील पार्किंग क्षमता ८० मोटारींची आहे. 

दुसरीकडे याच रस्त्यावरील महापालिकेच्या पार्किंग व्यवस्थेत (नटराज) ३५ मोटारींची क्षमता असून, केवळ २५ गाड्या उभ्या होत्या. मात्र, या पर्किंगसमोरील रस्त्यावरच वाहने उभी असल्याचे दिसून आले. 

जंगली महाराज रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढत असून, त्यात मोटारींची (कार) संख्या अधिक आहे. त्यामुळे सम व विषम तारखेनुसार रस्त्यालगत पार्किंग व्यवस्था केली आहे. लाखो रुपये खर्च करून संभाजी उद्यानाच्या बाजूला मोटारींसाठी ‘मॅकेनाइज्ड पार्किंग’ व्यवस्था केली असून, तिची क्षमता ८० मोटारींची आहे. सुरवातीच्या काळात प्रतिसाद मिळाला, मात्र गेल्या दोन वर्षांत वाहनचालक या पार्किंगचा वापर करीत नसल्याचे त्यांच्याकडील आकडेवारीवरून स्पष्ट झाले. रोज सरासरी १५ वाहने उभी असतात. मात्र, सुटीच्या दिवशी म्हणजे, शनिवारी आणि रविवारी दिवसभरात ६० ते ७० वाहने पार्क होत असल्याचे पार्किंग व्यवस्थापनाने सांगितले. या पार्किंगसमोरील जागेत मात्र दिवसभर पाय ठेवायलाही जागा नसते, अशी परिस्थिती असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

येथून काही अंतर पुढे गेल्यानंतर दुचाकी आणि चारचाकींसाठी पार्किंग व्यवस्था असून, तीत चारचाकी ३५ आणि पावणेतीनशे दुचाकी उभी करण्याची व्यवस्था आहे. मात्र, या ठिकाणीही पूर्ण क्षमतेने चारचाकी वाहने उभी केली जात नसल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

‘वाहने ने-आण करताना अडचणी’
हडपसरहून जंगली महाराज रस्त्यावर खासगी कामासाठी आलेले मंगेश मोरे म्हणाले, ‘‘या रस्त्यावर पार्किंगची दोन ठिकाणी व्यवस्था असली, तरी वाहने ने-आण करताना अडचणी येतात. त्यामुळे रस्त्यालगतच्या पार्किंगमध्ये वाहन उभे करणे सोयीचे होते.’’

पार्किंगचे दर 
मॅकेनाइज्ड  - चारचाकी प्रतितास ५ रुपये 
नटराज पार्किंग - प्रतितास १० रुपये

Web Title: legal four wheeler parking