भाजपमध्ये गेला अन्‌ पवित्र झाला! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

पिंपरी - भाजपमध्ये गेला अन्‌ पवित्र झाला, असा समज काही जणांचा झाला आहे. याउलट राष्ट्रवादीवर आरोप करणारेच तोडपाणी करतात, असा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. विधान परिषदेच्या निवडणुकीतील उमेदवार अनिल भोसले यांच्या प्रचारासाठी गुरुवारी (ता. 10) आयोजित केलेल्या नगरसेवकांच्या बैठकीसाठी ते पिंपरीत आले होते. त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे, पक्ष प्रवक्‍ते योगेश बहल, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 

अजित पवार म्हणाले, ""पाच वर्षांपूर्वी निवडणूक लढविताना राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दादागिरी करीत असल्याचा आरोप झाला होता. आता भाजपकडून भ्रष्टाचाराचा आरोप होत आहे. राज्यात तुमचे सरकार आहे. त्यामुळे खुशाल चौकशी करा. मागील पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी बांधण्यात आलेल्या भोसरी उड्डाण पुलाबाबत आत्ता चौकशी करण्याची मागणी हास्यास्पद आहे. हल्ली पक्षनिष्ठेला महत्त्व राहिलेले नाही. सध्या भाजपमध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पक्षात घेतले जात आहे. सध्या भाजपमध्ये गेला अन्‌ पवित्र झाला, असा काहींचा समज झाला आहे.'' पवार म्हणाले, ""कोणत्याही निवडणुका या जिंकण्यासाठीच असतात. मात्र निवडणुका पैशाच्या जोरावर नाही, तर विकासकामांच्या जोरावर जिंकल्या जातात. सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. यामुळे जरा कुठे काही झाले तरी ते लवकरच सर्वांसमोर येते. राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारेच तोडपाणी करतात. एखाद्या विषयावर सभागृहात जोरदारपणे बोलले की, संबंधित ठेकेदार तोंड गप्प करण्यासाठी त्यांना भेटतो अन्‌ मग त्यांचा विरोध मावळतो.'' ते म्हणाले, ""आम्ही शहराच्या विकासासाठी विविध प्रकल्प राबविले. राज्यात गेल्या अडीच वर्षांत सत्तेवर असलेल्या शहरातील तीनही आमदारांनी शहरासाठी किती निधी आणला, कोणता प्रकल्प आणला, याचे उत्तर त्यांनी द्यावे. याउलट आम्ही आघाडी सरकारच्या काळात गोरगरिबांना घरे मिळावीत म्हणून झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविला. मात्र भाजपमधील काही जणांनी त्यात अडथळे आणून प्रकल्प बंद पाडला. आम्ही नाव खराब होईल, असे चुकीचे काम करणार नाही. तसेच चुकीचे काम करणाऱ्यांना पाठीशीही घालणार नाही. एवढे वर्षे सत्तेत असल्यामुळे आमच्या लोकांना आंदोलनासाठी रस्त्यावर उतरण्याची सवय नाही. मात्र विनाकारण केलेले भ्रष्टाचाराचे आरोपही सहन करणार नाही.'' 

उमेदवारीबाबत पवारसाहेबांचा निर्णय 
स्थानिक नेते विलास लांडे व आझम पानसरे यांना का डावलण्यात आले, याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता पवार म्हणाले, ""राष्ट्रवादी पक्षात कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत पवारसाहेबच निर्णय घेत असतात. बहुतांश ठिकाणी गेल्या वेळी जो उमेदवार होता त्यालाच पुन्हा उमेदवारी दिली आहे. जिल्ह्यात आमची ताकद असल्याने अनिल भोसले हेच पुन्हा निवडून येतील,'' असा विश्‍वासही अजित पवार यांनी व्यक्‍त केला. 

Web Title: Legislative Council election campaign of a candidate Anil Bhosale