छायाचित्रांतून होणार  लेह-लडाखचे दर्शन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

छायाचित्रे पाहण्याची संधी शहरवासीयांना १९ ऑगस्ट अर्थात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त मिळणार आहे.

‘सकाळ’ व ‘देवदत्त फोटोग्राफी अँड स्कूल’तर्फे आयोजन
पिंपरी - क्षणाक्षणाला रंग बदलणारे आकाश, सावल्यांच्या खेळाप्रमाणे रंग बदलणाऱ्या पर्वतरांगा, रक्त गोठवणारी हिमशिखरे, वळणावळणांचा खडतर प्रवास आणि निर्मळ मनाची माणसे... हे वर्णन आहे केंद्रशासित प्रदेश लडाखचे. त्याची छायाचित्रे पाहण्याची संधी शहरवासीयांना १९ ऑगस्ट अर्थात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त मिळणार आहे.

‘सकाळ’ आणि ‘देवदत्त फोटोग्राफी अँड स्कूल’तर्फे लेह-लडाखमधील निसर्गाचा खजिना छायाचित्रांच्या (स्लाइड शो) माध्यमातून पाहता येणार आहे. यात २०० हून अधिक छायाचित्रे सोळा फूट उंच ‘एलईडी’वर दिसतील. चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच ते आठ या वेळेत हा स्लाइड शो आयोजित केला आहे. प्रसिद्ध छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी ही छायाचित्रे टिपली आहेत. छायाचित्रण करताना आलेले अनुभव, तांत्रिक बाबी, नियोजन आदींबाबत त्यांच्याशी बातचीत करता येणार आहे. संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य असून प्रवेशिका घेणे आवश्‍यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. मोफत प्रवेशिका देवदत्त फोटोग्राफी अँड स्कूलमध्ये (शॉप नं. १९, हर्शल हाईट्‌स, गावडे पेट्रोल पंपासमोर, लिंक रोड, चिंचवड) येथे उपलब्ध आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leh-Ladakh will be seen in the photographs