ईशान्येत ‘लेक वाचवा’चा जागर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

फर्ग्युसनमधील चार विद्यार्थ्यांचा उपक्रम; दहा हजार किलोमीटरचा प्रवास 

पुणे - ‘आम्ही केलेले विज्ञानाचे खेळ पाहून त्या मुलांचे चेहरे आनंदाने फुलायचे. ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ची साद पथनाट्यातून त्यांच्यापर्यंत पोचायची. हा प्रवासच अनोखा आणि सामाजिक बांधीलकीसह संस्कृतीला जोडणारा ठरला...,’’ असे विशाल सवाई सांगत होता. ईशान्य भारताच्या दहा हजार किलोमीटरच्या प्रवासाच्या आठवणी अन्‌ अनुभव उलगडत होता. तेथील गावोगाव अन्‌ शाळा- महाविद्यालये फिरून केलेल्या ‘लेक वाचवा’चा जागर तो मांडत होता. फर्ग्युसन महाविद्यालयातील चार धैर्यवेढ्या तरुणांनी केलेल्या अनोख्या प्रवासाची ही कहाणी.

विशालसह खंडू डोके, योगेश थोरात आणि विकास जाधव यांनी ‘लेक वाचवा’चा संदेश घेऊन एक महिना ईशान्य भारताचा प्रवास केला. फक्त एवढेच न करता विविध शाळांमध्ये जाऊन त्यांनी विज्ञानप्रसाराचे काम केले. २८ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान केलेल्या या प्रवासाचे अनुभव त्यांनी ‘सकाळ’शी शेअर केले. पश्‍चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम अशा चार राज्यांतील शहर आणि गावे फिरून या चौघांनी पाच हजार लोकांमध्ये पथनाट्यातून आणि फलकांमधून ‘लेक वाचवा’ची जनजागृती केली. तर, येथील शाळांमध्ये वैज्ञानिक खेळांच्या कार्यशाळा घेऊन

त्यांनी २५ शाळांमधील तीन हजार विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

विशाल म्हणाला, ‘‘ईशान्य भारतातील बहुतांश शाळांमध्ये विज्ञान प्रयोगशाळा नाहीत. हेच जाणून घेत आम्ही येथील मुलांमध्ये विज्ञान कार्यशाळेतून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वैज्ञानिक खेळ अगदी बारकाईने मुले समजून घ्यायची. या प्रवासात येथील माणसांनीही जवळ केले. स्वतःच्या कुटुंबात राहण्याची संधी दिली, संस्कृतीशी जोडले. विशेष म्हणजे येथे मुलींची संख्या पाहून खूप छान वाटले. आम्ही डोंगराळ भागातही फिरलो. ज्ञानप्रबोधिनी संस्थेने वैज्ञानिक खेळांचे सहकार्य करून उपक्रमाला पाठिंबा दिला.’’

खंडू म्हणाला, ‘‘येथे अजूनही सोयीसुविधा पोचलेल्या नाहीत, तरीही येथील माणसे आनंदाने राहात असल्याचा अभिमान वाटतो. आपण त्यांच्याविषयी वेगळाच दृष्टिकोन ठेवतो, तो बदलला पाहिजे. तेथे सरकारी कार्यालये, शाळा, महाविद्यालयांना भेट दिली. सर्वांनी उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.’’

काहीतरी हटके करावे हे मनात घेऊन प्रवासाला निघालो; पण एक वेगळाच बंध निर्माण होईल असे वाटले नव्हते. ज्यांच्यापर्यंत आजही सोयी-सुविधा पोचलेल्या नाहीत, त्यांचा विचार सरकारने केला पाहिजे. हा प्रवास खडतर होता असे म्हणणार नाही, कारण यात अनेकांनी साथ दिली. आम्हा चौघांसाठी हा प्रवास सकारात्मक विचार देणारा होता आणि एक अनुभवही. 
- विशाल सवाई

पॉकेटमनीमधून सर्व खर्च 
विशाल हा औरंगाबादचा असून, खंडू हा उस्मानाबादचा. त्यांचे वडील शेती करतात. स्वतःच्या पॉकेटमनीमधून विशाल सवाई आणि त्याच्या तिघा मित्रांनी ईशान्य भारताचा प्रवास केला. राष्ट्रीय सेवा योजनेत काम करत असताना त्यांना ही कल्पना सुचली. त्यातून मिळालेल्या एका महिन्याच्या सुटीचे नियोजन करून त्यांनी प्रवास केला. कधी खासगी वाहनांनी, तर कधी सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करत त्यांनी मुलांपर्यंत विज्ञानाचा प्रसार केला.

Web Title: lek vachava publicity