उधारी बुडविण्याच्या प्रकारामुळे व्यापारी चिंतेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

पुणे - मार्केट यार्ड येथील घाऊक किराणा भुसार मालाच्या बाजारात वारंवार होणाऱ्या उधारी बुडविण्याच्या प्रकारामुळे व्यापारी वर्ग चिंतेत आला आहे. एका किरकोळ विक्रेत्याने मोठ्या प्रमाणावर उधारी करून नुकतेच दुकान बंद करून निघून गेल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे.

पुणे - मार्केट यार्ड येथील घाऊक किराणा भुसार मालाच्या बाजारात वारंवार होणाऱ्या उधारी बुडविण्याच्या प्रकारामुळे व्यापारी वर्ग चिंतेत आला आहे. एका किरकोळ विक्रेत्याने मोठ्या प्रमाणावर उधारी करून नुकतेच दुकान बंद करून निघून गेल्याने हा विषय चर्चेचा झाला आहे.

व्यवसायासाठी पैसे उधार घेणे, उधारीवर माल घेणे, नवीन दुकानासाठी भांडवल म्हणून कर्ज काढणे अशा कारणांमुळे उधारी हा एक प्रश्‍न बनला आहे. यापूर्वीही उधारी बुडविण्याचे प्रकार घडले असून प्रत्येक वेळी व्यापारी वर्ग उधारीचे प्रमाण कमी करण्याबद्दल ठरवतात. व्यावसायिक स्पर्धेमुळे पुन्हा उधारीवर माल देणे सुरू करतात. त्यामुळे पुण्यातील बाजारपेठ ही उधारीवरील बाजारपेठ झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

घाऊक व्यापारी हे उत्पादक (मिलवाले), संबंधित धान्य- कडधान्य उत्पादन क्षेत्रातील मोठा व्यापारी यांच्याकडून माल मागवितात. या घाऊक व्यापाऱ्यांना त्यांचे पैसे त्वरित द्यावे लागतात. मात्र, हाच माल किरकोळ विक्रेत्यांना उधारीवर द्यावा लागतो. खरेदी केलेल्या मालाचे पैसे देण्याची मुदत तीस दिवस इतकी असली तरी प्रत्यक्षात तीन महिने उधारी राखून ठेवली जाते.

उधारीचा कालावधी पुण्यात जास्त
पुण्यातील बाजारात उधारीचा कालावधी सर्वांत जास्त असून, राज्यातील इतर बाजारात हा कालावधी जास्तीतजास्त एक महिना इतका आहे. कालावधी संपल्यानंतर त्यावर व्याजही आकारण्याचे प्रकार इतर बाजारात होतात, असे येथील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. किराणा भुसार मालाच्या बाजारातील व्यापारीच नाही, तर फळे भाजीपाला, कांदा- बटाटा बाजारातील अडत्यांची उधारी बुडविली गेल्याचे प्रकारही घडले आहेत.

उधारीचा व्यापाऱ्याला मनस्ताप
उधारीच्या प्रत्येक प्रकरणांत पोलिसांकडे तक्रार होतेच असे नाही. परंतु, उधार देणाऱ्या व्यापाऱ्याला त्याचा मनस्ताप सहन करावा लागतो. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीही या प्रकरणांत तांत्रिकतेमुळे हस्तक्षेप करू शकत नाही. शेतकऱ्याचे पैसे बुडविले तरच समिती कार्यवाही करते. व्यापारी प्रकारच्या मालाच्या आर्थिक फसवणुकीसंदर्भात काही करता येत नाही, असा समितीच्या प्रशासनाचा दावा आहे.

नुकसान टाळण्यासाठी...
* व्यापाऱ्यांनी एकत्रित येऊन निर्णय घेणे, त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे
* खरेदीदाराच्या आर्थिक व्यवहाराविषयी माहिती घेणे
* खरेदीदार- खातेदाराच्या दुकानावर नियमित भेट देणे
* खरेदीदाराच्या व्यवहाराच्या पद्धतीची माहिती घेणे
* हमी म्हणून धनादेश जमा करून घेणे
* उधारीच्या रकमेवर मर्यादा घालणे

उधारीचा प्रश्‍न चिंतेचा बनला असून, याविषयावर निर्णय घेण्यासाठी व्यापाऱ्यांची लवकरच बैठक बोलाविणार आहोत. बाजारात घडलेला प्रकार चुकीचा असून, संबंधित व्यापारी अनेक वर्षांपासून व्यवसाय करीत होता. त्यांच्या दुकानातून ज्या पद्धतीने माल नेण्यात आला तो प्रकार गंभीर आहे. त्याचा निश्‍चितच विचार करायला हवा.
- प्रवीण चोरबेले, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्‌स चेंबर

Web Title: Lending to the commercial nature of spirit