महाळुंगे, साकोरे परिसरात बिबट्याची दहशत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यात महाळुंगे पडवळ व साकोरे परिसरात बिबट्याचे दिवसा दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 

महाळुंगे पडवळ - आंबेगाव तालुक्‍यात महाळुंगे पडवळ व साकोरे परिसरात बिबट्याचे दिवसा दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. 

राजेंद्र नामदेव आवटे यांच्या मालकीची शेळी बुधवारी (ता.२०) पहाटे बिबट्याने फस्त केली. दीड महिन्यांपासून बिबट्याकडून सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. कांदळीचे उपसरपंच संग्राम फुलवडे आवटेमळा येथे एका नातेवाइकांकडे आले होते. त्यांना सोमवारी (ता. १८) रात्री रस्त्यावर शिवाई मंदिरानजीक शतपावली करताना बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. त्यांनी बॅटरीच्या प्रकाशात पाहिले असता, बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आरडाओरडा केल्याने फुलवडे थोडक्‍यात बचावले. मणका डोंगरावरील मेंढपाळांनाही बिबट्याच्या गुरगुरण्याचा सतत आवाज येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथील कुत्र्यांचादेखील बिबट्याने फडशा पाडला आहे. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

साकोरे येथे पमन चंद्रकांत गाडे यांना शेतात बिबट्या दिसल्याने त्यांनी तेथून धूम ठोकली. आंब्याच्या झाडाजवळ काम करत असताना कल्पना चिखले यांनाही बिबट्याने दर्शन दिले. बिबट्याकडून परिसरात गोठ्यावर हल्ले होण्याचे प्रमाण सध्या वाढले आहे.

आतापर्यंत वीस जनावरे फस्त
साकोरे व महाळुंगे पडवळ परिसरात आतापर्यंत शेळ्या, मेढ्या, कुत्री, गाई, वासरे आदी सुमारे १५ ते वीस जनावरे बिबट्याने फस्त केली आहेत. एक महिन्यापूर्वी आवटेमळा परिसरात बिबट्याने गोठ्यातील जनावरे ठार केली होती. तेव्हापासून बिबट्याने सुरू केलेले हल्ला सत्र थांबलेले नाही. बिबट्याला पकडण्यात वन खाते अपयशी ठरत असल्याचे माजी सरपंच एकनाथ गाडे व बंडेश गाडे यांनी सांगितले.

Web Title: leopard