उदाचीवाडीतील बिबट्या जेरबंद

Leopard
Leopard

गराडे/पारगाव मेमाणे - उदाचीवाडी (ता. पुरंदर) येथे असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन कर्मचाऱ्यांना अखेर यश आले. येथे एका चिंकाराची शिकार बिबट्याने केल्याची माहिती ग्रामस्थांनी वन विभागाला दिली. त्यानंतर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी आले. बिबट्याने शिकार केलेल्या चिंकाराचे वय दोन वर्षे असून, हल्ला करणाऱ्या बिबट्याचे वय साधारण एक ते दीड वर्षे आहे व बिबट्या याच परिसरात असल्याचे निश्‍चित समजल्यानंतर वन विभागाच्या वतीने पुणे येथील कात्रज उद्यानातील कर्मचाऱ्यांना कळविले व गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली. या वेळी बिबट्या शेजारीच असलेल्या मोठ्या दगडांच्या कपारीला बसलेला दिसला. 

कात्रज उद्यानातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने दुपारी तीनला बिबट्या शोधण्याची कारवाई सुरू झाली. सुरवातीला तीन वेळा बिबट्याने चकवा दिला. पण नंतर एका मोठ्या कपारीच्या आडोशाला बिबट्या बसल्याची संधी साधत त्याला भुलीचे इंजक्‍शन देण्यात कर्मचारी यशस्वी झाले. बिबट्याला जाळीत पकडण्याची कारवाई सायंकाळी सव्वापाचपर्यंत सुरू राहिली. त्यानंतर कात्रजच्या वन कर्मचाऱ्यांनी बिबट्याला ताम्हीणी घाटातील वन विभागाच्या क्षेत्रात सोडून दिले. या कारवाईमध्ये नवनाथ मेमाणे (वय ३०) व अकबर मुलाणी (वय ४०) हे दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले. या वेळी वनधिकारी श्रीमती जयश्री जाधव, वनपाल महादेव सस्ते, वन्यजीव छायाचित्रकार हमीद शेख, सरपंच संतोष कुंभारकर, पोलिस पाटील रूपाली कुंभारकर, अर्जुन कुंभारकर, सोमनाथ कुंभारकर, अजय कुंभारकर, रामदास मगर, सुभाष मगर, वनकर्मचारी नवनाथ मेमाणे, दत्ता खोमणे, बाळू खटाटे यांचे सहकार्य लाभले.

बिबट्याने चिंकाराची शिकार केली, ही बाब ग्रामस्थांना माहीत नव्हती. पण जर या जागी एखाद्या व्यक्तीचे काही बरे वाईट झाले असते तर. तेव्हा वन विभागाच्या वतीने याची कल्पना ग्रामस्थांना देणे गरजेचे होते.
- नामदेव कुंभारकर, सरपंच, वनपुरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com